क्रिप्टोकरन्सी : आभासी चलन

    दिनांक :09-Mar-2020
|
सीए अभिजित केळकर
 
भारतात सध्या अधिकाधिक व्यवहार ऑनलाईन करण्याचं पेव फुटलं आहे. ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इंडिया’ सारख्या योजना आखून सरकारही ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी जागतिक स्तरावर बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीने सगळ्यांना गोंधळात टाकलं आहे. त्यात भरीस भर म्हणून नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय देत त्यावर लादण्यात आलेले सर्व निर्बंध हटवले आहेत. काय आहे हे क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) ? भारतात जिथे आर्थिक साक्षरता मूळातच कमी आहे, तिथे बिटकॉईन ही संकल्पना तशी अगदीच नवीन आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका कॉंप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.
 
 
जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साइट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं. ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईिंनग होईल. ब्लॉकचेन ही एक अशी ऑनलाईन व्यवस्था आहे जिथे डिजिटल व्यवहार करता येतात. ही कुठलीही आर्थिक सेवा नसून फक्त एक आर्थिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. बिटकॉईन इंडिया सारख्या जवळपास 25 साइट्स आहेत जिथं तुम्ही हे व्यवहार करू शकता. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे त्यामुळे हे एक आभासी चलन आहे किंवा हे एक आंतरजालीय चलन आहे. 
 
bit_1  H x W: 0
 
 
बिटकॉईनचे फायदे काय? बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही. कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. यात मध्यस्थाची गरज नसते. इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही. पेमेंट सर्व्हिस गेटवे प्रोव्हायडर म्हणून याचा उपयोग होऊ शकतो, म्हणजे ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण होऊ शकते. त्यासाठी सगळ्यांत सोपा गेट वे आहे. जगभरात अनेक वित्तीय संस्था बिटकॉईनचे ऑनलाईन व्यवहार सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातही रिझर्व्ह बँक त्याबाबतीत सकारात्मक आहे. हा ऑनलाईन व्यवहारांसाठी आहे व त्यासाठी ब्लॉकचेन सुरक्षित प्रणाली समजली जाते. यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलंही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो. तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते.
 
 
किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरूपात अर्थात कॉंप्युटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणार्‍यांनाही माहीत नसतात. नुकत्याच झालेल्या एका पाहणीनुसार जगात साधारण 1 करोड पेक्ष्या जास्त लोक या चलनाचा व्यवहारासाठी वापर करताना आढळले. जगभरात आज लाखाच्या वर व्यापारी बिटकॉइनचा चलन म्हणून स्वीकार करत आहेत. नुकतेच जगातील एका मोठ्या सल्लागार कंपनीने हाँगकाँगमध्ये आपल्या सल्ल्यासाठीचे बिल बिटकॉइनमध्ये स्वीकारले. बिटकॉइनने केलेले पेमेंट आज जगात अक्षरशः सुरक्षितपणे 2 सेकंदांच्या आत पोहोचवले जाते. माझ्या मते आभासी चालनाबाबत दिसणार्‍या या उत्साहाला तीन महत्त्वाची कारणे आहेत. एकतर बिटकॉइनचा पुरवठा हा मर्यादित राहणारा आहे. दुसरे कारण म्हणजे बरेच देश आपआपल्या देशांचे पारंपरिक चलन छापून बाजारात अमर्याद पुरवठा करत आहेत आणि तिसरे कारण म्हणजे बिटकॉइन हे मालकाबद्दलची गुप्तता पाळू शकते.
 
 
पण सावधान ! पुढे धोका आहे... बिटकॉईनच्या वापरावर भारतात आता बंदी नसली, तरी तुम्ही गुंतवणूक म्हणून यात पैसे टाकण्याचा विचार करत असाल, तर थोडं सावध राहिलेलं बरं. कारण आतापर्यंत बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवणारे लोक हे गॅम्बिंलग, हॅकिंगसारखे कारभार करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याचं भवितव्य अधांतरी आहे. अर्थात, बिटकॉईनसारखं कोणतंही नवं तंत्रज्ञान तुम्हाला कमी वेळात श्रीमंत करू शकत नाही. गुंतवणुकीसाठी कोणतीही गोष्ट खूपच आकर्षक वाटत असेल किंवा काही मूलभूत आर्थिक नियमांचं पालन होत नसेल, तर पुन्हा विचार करा. बिटकॉईन वाढतच जाईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. म्हणून यातून फायदा होईलच, याची हमी नाही. दुसरं म्हणजे, एनक्रिप्टेड करंसीमधल्या व्यवहारातली गोपनीयता हादेखील एक संशयाचाच मुद्दा आहे. कारण व्यवहारांवर कुणाचंही नियंत्रण नसल्याचं हे द्योतक आहे. तेव्हा बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार असाल तर थोडं जपूनच. हे चलन कोणत्याही वित्तसंस्थांच्या किंवा सरकारी नियंत्रणांच्या बाहेर असल्यामुळे गुन्हेगारी, राजकारणी, सत्ताधीश यांना ह्याबद्दल कमालीचे आकर्षण वाटण्याची शक्यता आहे.
 
 
आज अशा पैशाचे रूपांतर सोने, हिरे किंवा रोख स्वरूपात असेल, पण संख्यात्मक चलन हे गुणात्मक इतके सरस आहे की कदाचित त्यामुळे भविष्यात सोन्याची मागणी कमी होऊन त्याचे भाव गडगडतील; पण त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारतासारख्या देशातील उद्योगांना पैसा उभा करायचा असेल तर याच चलनाचे बॉंड करून कोणत्याही जाचक अटी-नियमांशिवाय सोपा मार्ग सापडेल. बिटकॉइनची म्हणजेच संख्यात्मक चलनाची ही क्रांती इतर क्रांतींप्रमाणेच दुधारी आहे. शेवटी आपण ती कशी वापरणार याने ते चलन चांगले की वाईट हे समजेल.
9422126890