मनपा रुग्णालयात रुग्णांची संख्या रोडावली

    दिनांक :18-Apr-2020
|
200 चा आकडा 50-60 पर्यंत घसरला
सदर डायग्नोसिस सेंटरमध्ये सोशल डिस्टन्सिंग
 
नागपूर, 
कोरोना विषाणूचे सावट शहरावर आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सं‘येत सतत वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे रुग्ण असलेला परिसर सील केला जात आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे महानगरपालिकेच्या सदर येथील डायग्नोसिस केंद्रात दररोज असणारी 200 ची रुग्ण सं‘या 50 ते 60 वर आल्याची धक्कादायक माहिती आढळून आली.
सदर प्रतिनिधीने या डायग्नोसिस सेंटरला भेट दिली असता हे वास्तव समोर आले. उपराजधानीत कोरोना पॉझिटिव्हची रुग्ण सं‘या 63 वर पोहोचली आहे. सतरंजीपुरा, वनदेवीनगर, गौतमनगर, पिवळी नदी परिसर आदी वस्त्या सील करण्यात आलेल्या आहेत. संशयित रुग्णांसाठी आमदार निवासात उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय डागा स्मृती रुग्णालयाला कोरोनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. मात्र, महानगरपालिकेच्या दवाखान्यात अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. महापालिकेची आरोग्य सेवा पुरेशी सक्षम नसल्यानेच येथे खासगी हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा जोमाने फोफावली आहे. मनपाच्या आरोग्य सेवेसाठी बजेटमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असली तरी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची वानवा नेहमीच भेडसावते. मनपाच्या शहरातील दवाखान्यांना अवकळाही आली आहे.
 
 
indira_1  H x W
 
महानगरपालिकेच्या आरोग्यसेवांची स्थिती किती दयनीय झाली आहे, याचा अनुभव रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना दररोज येत आहे. रुग्णालयात इंजेक्शन द्यायला साधी सुई आणि टाके घालायला साहित्य उपलब्ध नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात औषधे उपलब्ध नसतात. डॉक्टरांनी पाच औषधे लिहून दिली तर त्यातील तीन औषधे पालिकेच्या रुग्णालयात नसतात. रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सध्या असलेल्या खाटा कमी पडू लागल्या आहेत. बाह्य रुग्ण विभाग सुरू झाला की अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या खिडक्या वेळेवर सुरू होत नाहीत. कर्मचारी वर्ग कमी आहे. डॉक्टर जागेवर नसतात किंवा येतच नाहीत. रुग्णांची सं‘या आणि खिडक्यांची सं‘या यात तफावत असते. त्यामुळे त्यात रुग्णांचा बराच वेळ वाया जातो. अशा तक्रारी करण्यात आल्या.
 
दरवर्षी आरोग्यसेवेसाठी पालिका कोट्यवधींचे बजेट ठेवते तर मग ही परिस्थिती का उद्भवली, असा प्रश्र्न उपस्थित होत आहे. किमान मूलभूत सोईसुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत. किमान शहरातील गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी तरी मनपा आरोग्य सेवेचे स्वतंत्र बजेट गरजेचे झाले आहे. 30 हजारांच्या नागरी वस्तीसाठी किमान 1 आरोग्य केंद्र अपेक्षित मानले जाते. शहराची लोकसंख्या 35 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तरी यासाठी किमान पुुरेशी आरोग्य केंद्रे नाहीत. शहरात मनपाचे सध्या गांधीनगरातील इंदिरा गांधी हॉस्पिटल तेवढे महत्त्वाचे आहे. पण यातही डॉक्टरांची वानवा आहे. मनपात बीएएमएस डॉक्टरांचा अधिक भरणा आहे. डीएचएमई म्हणजे डिप्लोमाधारक डॉक्टर आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर या डिप्लोमाधारक डॉक्टराला उपायुक्तांचा दर्जाही दिल्याची खमंग चर्चा महानगरपालिकेत सुरू आहे. याशिवाय मनपाच्या सुतिकागृहाची कामगिरी समाधानकारक नाही. एकूण मनपाच्या दवाखान्याचा दर्जा फारच खालावलेला आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांना मनपाच्या सेवेत दाखल करून घेतले आहे. डॉ. सवई हे फारच शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या ज्ञानाचा
फायदा मनपाला कितपत होतो, हे येणार्‍या काळात दिसून येणारच आहे.
 
 
महानगरपालिकेचे सदर आणि महाल येथे ओपीडी दवाखाने आहेत. याठिकाणी रुग्णांची गर्दीही असते. सदर येथील डायग्नोसिस सेंटरमध्ये रोज 200 ते 250 रुग्ण उपचारासाठी यायचे. परंतु, हल्ली कोरोनाच्या धास्तीमुळे ही रुग्ण सं‘या चांगलीच रोडावली आहे. सध्या 50 ते 60 रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्णांमध्येही सामाजिक दूरता राहावी म्हणून याठिकाणी चुना मारून गोलाकार डबे तयार करण्यात आलेले आहेत. या डब्यांमध्ये रुग्णांना उभे केले जाते. प्रत्येक सरकारी कार्यालय, बँका, दवाखान्यात येणार्‍यांच्या हातावर सॅनिटायझर दिले जाते. परंतु, याठिकाणी अशी कुठलीही व्यवस्था नाही. मात्र, रुग्णांना हात धुण्याची व्यवस्था याठिकाणी करून देण्यात आली आहे. मनपाच्या आरोग्य सेवेत आता अर्धवेळ तज्ज्ञ डॉक्टर्स घेतले गेले असले तरी आरोग्य सेवेत फारशी सुधारणा झालेली नाही. पुरेशी औषधं नसल्याने म्हणा वा कधी वैद्यकीय उपचारांत हलगर्जीपणा झाल्यामुळे म्हणा, मनपाची आरोग्य सेवा नेहमीच चर्चेत असते.
 
मनपाने केलेल्या उपाययोजना
- तक्रारी घेण्याकरिता मनपा कार्यालय येथे स्वतंत्र कक्ष.
- सनियंत्रण अधिकार्‍यांची नियुक्ती
- नागरिकांना समुपदेशन व तक‘ारीकरिता नियंत्रण कक्ष
- सफाई कर्मचारी यांना संसर्ग होऊ नयेत म्हणून हॅण्ड ग्लोज व रुमालाचे वितरण.
- शहरामध्ये बाहेरील शहरातून, राज्यातून व विदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी पथक गठित
- सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, दवाखाने, सार्वजनिक ठिकाणे व प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी.
- प्रभागनिहाय फॉिंगग मशिनद्वारे व फवारणी पंपाद्वारे जंतुनाशक फवारणी व धुवारणी सुरू आहे.
- शहरातील सर्व एटीएम मशीन कक्षांची स्वच्छता व जंतुनाशक फवारणी.
- रस्त्यांवरील बेघर व भिकार्‍यांसाठी निवारा केंद्रे
- होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांशी दररोज मनपाची पथके संपर्कात.