नागपूरहून आलेली महिला आणि घरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :24-Apr-2020
|
- रुग्णवाहिका मालक व चालकाविरुद्धही गुन्हा

ambulance_1  H
 
वर्धा,
नागपूरच्या सतरंजीपुरा येथुन रुग्णवाहिकेत आलेल्या एका महिलेविरुद्ध साथरोग प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कोणतीही परवानगी न घेता सदर महिला वर्धेतील तिच्या नातेवाईकांकडे आली आहे.
 
वर्धेतील एक रुग्णवाहिका रुग्ण घेऊन नागपूरला गेली होती. अंबुलन्स परत वर्धेला येताना त्यात नागपूरहुन एक महिला वर्धेत आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती बोरकर यांना 8 वाजता मिळाली. त्यांनी सदर घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना दिली. श्री बगळे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री पारधी नायब तहसीलदार जाधवर शहानिशा केल्यानंतर महिला महादेवपु-यातील एका नातेवाईकांकडे आली असल्याचे समजले. महिला नागपूरच्या सतरंजीपुरा येथून आल्याचे समजते मात्र ती कोणतीही माहिती पोलिसांना देत नसल्याचे श्री बगळे यांनी सांगितले. महिला, तिचे नातेवाईक, अंबुलन्स मालक व चालकांविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंध कायद्याच्या कलम 3, भादंवी च्या कलम 269, 270, 278 आणि 279 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या कुटुंबियांना आय टी आय येथील कोविड सेंटर येथे ठेवण्याची कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री चिन्नोर करीत आहेत.
 
 
यापुढे कोरोना बाधित जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने वर्धेत प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिला आहे.