कळमना परिसरातील 12 लोकांना घेतले ताब्यात

    दिनांक :25-Apr-2020
|
-शनिवारी पहाटेच्या अंधारात कारवाई
-आमदार निवासात रवानगी
 
नागपूर, 
शनिवारी पहाटे कळमना परिसरातील एका गोदामावर पोलिसांनी छापा मारून लपून बसलेल्या बारा जणांना पकडले आणि आमदार निवासातील अलगीकरण कक्षात टाकले. सतरंजीपुराच्या एका नागरिकाला दोन दिवसापूर्वी कळमना बाजार परिसरातील याच क्षेत्रात आरोग्य विभागाच्या चमूने विलगीकरण कक्षात पाठविले. त्याला त्याच्या परिवाराबद्दल माहिती विचारली तर त्याने आरोग्य विभागाची दिशाभूल करीत त्याचा परिवार बिहारमध्ये असल्याचे सांगितले होते. आरोग्य विभागाच्या चमूने जेव्हा अधिकची माहिती घेतली तर माहिती मिळाली की त्याचा परिवार नागपूरमध्ये कुठेतरी दडून बसलेला आहे.
 
कळमना परिसरातील विजयनगरात काल रात्री एका गोदामामध्ये दिवा सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. शंका आल्याने त्यांनी पोलिसांना याबद्दलची सूचना दिली. मध्यरात्रीनंतर मिळालेल्या या माहितीच्या आधारे महापालिकेच्या आरोग्य विभाग चमूला सोबत घेत पोलिसांनी त्या गोदामावर छापा मारला. तेथे लपून बसलेल्या 12 लोकांना पकडून विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले. लकडगंज झोनल अधिकारी डॉ. उमेश मोकाडे यांच्या उपस्थितीत कळमना पोलिसांनी ही कारवाई केली.
 

nagpur are_1  H
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची आरोग्य विभागाची चमू अहोरात्र प्रयत्न करत आहे. सतरंजीपुराच्या त्या एका रुग्णामुळे 235 च्या वर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने आपल्या वतीने तेथील 30 घरांमध्ये राहणार्‍या 150 नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. तथापि लोक याबद्दल माहिती देत नाही किंवा प्रशासनाची दिशाभूल करीत असल्यामुळे या कामात अडचण निर्माण होत आहे. नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
 
अशाप्रकारे माहिती लपविणे हे दुर्देवी आणि क्लेशदायक असून नागरिकांनी पलायन करण्याऐवजी मनपाच्या चमूला सहकार्य करावे आणि आपला उपचार करून घ्यावा. ज्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जाईल जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येईल. कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचा उपचार केला जाईल. नागरिकांनी समोर येऊन मनपाच्या चमूला सहकार्य करावे. त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा देत नागरिकांनी नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.