कोरोनाच्या लढाईत स्वतःचा व समाजाचा योद्धा बना

    दिनांक :25-Apr-2020
|
- महापौर राखी कंचर्लावार यांचे आवाहन

Rakhi karchalwar_1 & 
 
 
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
चंद्रपूर शहर कोरोनामुक्त ठेवण्याची ही लढाई आहे. टाळेबंदीचे काटेकोर पालन करून स्वत:चा व समाजाचा योद्धा बना. इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क वापरा. सामाजिक अंतर पाळा, प्रत्येकाने कोरोनाविरुद्धची लढाई स्वत: योद्धा बनून लढण्याचे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले आहे.
 
 
चंद्रपूर शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये, हे केवळ नागरिकांच्या हाती आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहरात एकही रुग्ण सकारात्मक आढळून नाही. मात्र, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महानगरपालिकेतर्फे युद्धस्तरावर ‘कोरोना अ‍ॅक्शन प्लॅन’ राबविला. या आराखड्याची तत्परतेने अंमलबजावणी सुरू आहे. मनपाचे आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व विविध विभागाचे 1 हजार 200 कर्मचारी अहोरात्र कार्यरत असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने बाजार, रेल्वे स्थानक, बसस्थानक, सार्वजनिक प्रसाधनगृहे, दवाखाने, वर्दळीच्या ठिकाणी फवारणी, धुरळणी व निर्जंतुकीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सेफ्टी कीटसह सज्ज ठेवण्यात आले आहे. मनपाचे शिक्षक घरोघरी जाऊन कोरोना सदृश्य रुग्णांचा सर्व्हे करून माहिती गोळा करीत आहेत. नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यासाठी 4 केंद्रीय स्वयंपाकघराची व्यवस्था करून गरजू नागरीकांना दररोज डबे पुरविण्यात येत आहेत. शहरामध्ये 7 क्वारंटाईन सेंटर सुसज्ज करण्यात आलेले असून, त्यामध्ये नागरीकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
बेघर, विस्थापित, कामगार, परराज्यातील अडकेलेले कामगार यांच्यासाठी 13 निवारागृहाची निर्मिती करण्यात आली. त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आणि त्यांना इतर सुविधा देण्यात येत आहे. कामासाठी शहरात आलेले अनेक लोक टाळेबंदीमुळे शहरात अडकले. या लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. दररोज गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था मनपाच्या माध्यमातून करीत आहेत. हे अभिनंदनीय कार्य असल्याचे त्या म्हणाल्या. जटपुरा गेट येथे स्प्रिंकलर्सद्वारे यांत्रिकीरित्या निर्जंतुकीकरण करण्यात येते. गर्दी टाळण्यास व सामाजीक अंतर राखण्याच्या दृष्टीने गंजवार्ड येथील भाजी मार्केट कोहिनूर तलाव व रामाळा तलाव येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आला आहे.
 
 
संचारबंदीच्या काळात शहरातील एकटे राहणारे वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींना सामाजिक बांधिलकी म्हणून मनपातर्फे किराणा सामान, औषधे इत्यादी साहित्य घरपोच पोहचविण्याची सुविधा दिली जाते. तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास एका कुटुंबातील एका व्यक्तीस पास देण्यात येणार असून, त्यांना आठवड्यातील एक दिवस या वस्तू खरेदीसाठी सुट मिळणार आहे.
जीवनावश्यक सर्व वस्तू मुबलक आहे. भाजीपाला, किराणा, दुध यासारख्या सेवा मिळायला काहीही अडचण नाही. किमान पुढील काही दिवस स्वत:वर बंधन घालणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे. आवश्यक कामाने घराबाहेर पडलाच, तर लवकरात लवकर घरात यावे. घरात प्रवेश करताना साबणाने हात स्वच्छ धुवावे. योद्धा बनणे म्हणजे टाळेबंदीचे काटेकोरपणे पालन करणे होय, हे केले नाही म्हणजे समाजाचे शत्रू बनणे होय. त्यामुळे समाजाचा शत्रू न बनता स्वत:चा आणि समाजाचा योद्धा बना, असे आवाहन कंचर्लावार यांनी चंद्रपुरकरांना केले आहे.