अमरावतीत संचारबंदीच्या तरतुदीत बदल

    दिनांक :25-Apr-2020
|
- सकाळी 8 ते दुपारी 12 वेळ निश्चित 

shailesh naval _1 &n 
 
तभा वृत्तसेवा
अमरावती,
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदीची कार्यवाही अधिक कठोर करण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्रीची वेळ आता सकाळी 8 ते दुपारी 12 अशी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा सायन्सकोर मैदान, दसरा मैदान भाजीबाजार व फळयार्ड 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय अमरावती महापालिका क्षेत्रात लागू राहतील.
 
 
तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज शनिवारी जारी केला. सायन्सकोर मैदान, दसरा मैदान, भाजीबाजार व फळयार्ड 27 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. तथापि, अमरावती शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भाजीबाजार व फळयार्ड 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही भाजीपाला, फळविक्रेत्याने महापालिकेच्या परवानगीविना व्यवसाय करू नये. त्यासाठी महापालिका आयुक्तांकडून प्रभागनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. क्लस्टर व कंटेनमेंट झोनबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत. केवळ जीवनावश्यक वस्तू, धान्य, दूध, किराणा माल दुकाने सुरू राहतील. रूग्णालये व औषधालये नियमितपणे सुरू राहील.
 
 
वाहन जप्ती व दंडात्मक कार्यवाही व्हावी
क्लस्टर अँड कंटेनमेंट झोनमध्ये गर्दी होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 ची काटेकोर अंमलबजावणी करावी. अनावश्यक वाहतूकीला प्रतिबंध घालण्यासाठी वाहनांवर जप्ती व दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. ही कार्यवाही काटेकोरपणे करावी. केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी व व्यक्ती यांनाच सूट द्यावी. इतर कुणीही अनावश्यकरीत्या वाहन घेऊन फिरत असल्यास वाहन जप्ती व दंडात्मक कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.