कामरगाव येथे कन्फेक्श्‍नरी गोदामाला आग

    दिनांक :25-Apr-2020
|
- 6 लाख 52 हजाराचे नुकसान

Confectionery warehouse f 
 
 
कारंजा लाड,
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील बसस्थानक मार्गावर असलेल्या मयुर बुटहाऊस या दुकानाच्या मागील गोदामाला आग लागून त्या आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना 23 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत 6 लाख 52 हजाराचे नुकसान झाल्याची फिर्याद दुकान मालकाने कामरगाव पोलिस चौकीत दिली आहे.
 
 
प्राप्त माहितीनुसार, सदर दुकान कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असूनही गोदामातून धुराचे लोट निघत असल्याने आग लागल्याचे लक्षात आल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत आगीने गोदामातील साहित्य आपल्या कवेत घेतले होते. अखेर आग विझविण्यासाठी कारंजा नप अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एका तासाच्या प्रयत्नानंतर गावकर्‍यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु तोपर्यंत गोदामातील साहित्य जळून खाक झाले होते. सदर प्रकरणी दुकान मालक अफजल खॉ गुलशेर खॉ यांनी कामरगाव पोलिस चौकीत फिर्याद दाखल केली असून, 6 लाख 52 हजार 500 रूपयाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. आगीत जळालेल्या साहित्यात भरणे, गुंड, दिवान, सोफासेट, रॅक, गृहउपयोगी वस्तु, व मुलगा जावेद खॉ याच्या लग्नाच्या भेटवस्तुंचा समावेश आहे. आगीचे नेमके कारण मात्र कळु शकले नाही.