रा. स्व. संघाच्या 177 स्वयंसेवकांची दिवसरात्र मेहनत

    दिनांक :25-Apr-2020
|
- 34 हजारांपर्यंत पोहोचली मदत
- उपासाची उसळही पोहोचवणारा सच्चा कार्यकर्ता
 
wardha rss_1  H 
 
 
तभा वृत्तसेवा
वर्धा,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवाभाव हा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राष्ट्रसेवा आधी म्हणून कायम आपत्तीच्या ठिकाणी पोहोचणार्‍या स्वयंसेवकांनी रात्रंदिवस मेहनत घेणे सुरू केले आहे. शेवटचा गरजू व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नियोजन करून मदतीचा ओघ कायम ठेवला. जिल्ह्यात 177 स्वयंसेवकांनी 8 हजार 403 जीवनावश्यक किटचे वाटप करून जवळपास 34 हजार 810 नागरिकांपर्यंत फक्त पोहोचलेच नाही तर त्या व्यक्तींची आस्तेने विचारपूसही करीत आहेत. संजय नाईक या स्वयंसेवकाने तर चक्क एका उपास असलेल्या व्यक्तीला साबुदाना खिचडीही पोहोचवण्याचे पुण्यकर्म केले.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने वर्धा, सेलू, सिंदीरेल्वे, समुद्रपूर, हिंगणघाट, वडनेर, देवळी, पुलगाव, आर्वी तालुक्यासह वर्धा, हिंगणघाट, पुलगाव आणि आर्वी नगरात 177 स्वयंसेवकांनी 8 हजार 403 धान्य किटचे वाटप केले. वर्धा नगरात 6 हजार 700, हिंगणघाट येथे 27 हजार, पुलगाव येथे 1 हजार 100, तर आर्वी येथे 10 लोकांना असे 34 हजार 810 लोकांना सेवेचा लाभ दिला. या सोबतच कोरोना महामारी विषयी जनजागृती व स्वच्छता अभियान, नागरिकांना मास्कचे वाटप, भटक्या जमातीला अन्न धान्य व शासकीय मदत, जवळपास 150 लोकांना दोन्ही वेळचे जेवन, पोलिसांना चहा, बिस्किटाचे वितरण करण्यात येत आहे.
 
 
जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, जिल्हा कार्यवाह शिवाजी अडसड, जिल्हा सह कार्यवाह योगेश ओक, मुकुंद पिंपळगावकर, धनंजय भट, धनंजय बाराहाते, पंकज आत्राम, मंगेश परसोडकर, देवेंद्र देशमुख, शाम जुनघरे, अविनाश भोपे, संजय नाईक आदी स्वयंसेवक सातत्याने मदतीसाठी झटत आहेत.
 
 
ज्या वस्तीत मदत पोहोचली नाही, अशी माहिती मिळताच स्वयंसेवक मदतीसाठी तयार केलेल्या जिप्सीतून साहित्य घेऊन त्या वस्तीमध्ये पोहोचतात.