विनापरवाना कोणतीही दुकाने उघडू नका

    दिनांक :25-Apr-2020
|
- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

chandrapur stop_1 &n 

 
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
जिल्ह्यामध्ये एकही कोरोना सकारात्मक रुग्ण नाही. केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्या असल्यामुळे टाळेबंदीमध्ये शिथीलता आली, असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय कोणत्याही व्यापारी प्रतिष्ठाने उघडू नयेत. जिल्ह्यातील टाळेबंदी 3 मेपर्यंत कायम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
 
 
काही ठिकाणी परस्पर दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील असून, कोणीही प्रवेश केल्यास 14 दिवस कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून आतमध्ये एकही चूक होणार नाही, याकडे लक्ष वेधण्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी शनिवारी चंद्रपूर शहरातील तीन प्रभागांमध्ये रंगीत तालीम करण्यात आली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागातदेखील रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून, अशा लोकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
शासनामार्फत निराश्रित, निराधार लोकांना जेवण पुरविल्या जाते. शिव भोजन योजनेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच आता केशरी शिधा कार्ड असणार्‍या जनतेलाही अन्नधान्य पुरविल्या जात आहे. शहरात संचारबंदी सुरू असून, अशा वेळी संचारबंदीचे नियम तोडल्यास आवश्यक कलमान्वये गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना आजार संपर्कातून येतो. त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अतिशय अनिवार्य आहे. त्यादृष्टीने सण उत्सव साजरे करताना लक्ष ठेवावे. 3 मेपर्यंत टाळेबंदी कायम असून, आतापर्यंत जनतेने अतिशय संयमाने सहकार्य केले असून यापुढे देखील अशीच अपेक्षा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
शनिवार, 25 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 96 नागरिकांची नोंद करण्यात आली असून, यातील 88 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 80 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 13 आहे. यापैकी 2 हजार 535 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 478 आहे. जिल्ह्यामध्ये ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 106 असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.