अमरावतीत आणखी पाच कोरोनाबाधित

    दिनांक :25-Apr-2020
|
- आतापर्यंत 19 रूग्णांची झाली नोंद

positve _1  H x
 
 
तभा वृत्तसेवा
अमरावती,
अमरावती येथे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता पर्यंत आढळलेल्या एकूण 19 रुग्णांपैकी 6 मयत व्यक्तीसह 9 कोविड रुग्णालयात उपचार घेत असून 4 जणांना सुटी देण्यात आली आहे. 
 
अमरावती येथे शुक्रवारी रात्री दोन पुरुष व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. ते दोघेही दोघेही कोविड रुग्णालयात भरती आहेत. यापैकी एक कमेला ग्राऊंड (वय 45) येथील असून दुसरा हैदरपुरा (वय 66) येथील आहे. या दोन परिसरातील अनुक्रमे 70 व 60 वर्ष वय असलेल्या महिलांचे 20 तारखेला निधन झाले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानुसार सदर 2 रुग्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठेवण्यात आले. आता दोघांनाही कोविड वार्डात हलविण्यात आले असून उपचार होत आहेत. शनिवारी सांयकाळी प्राप्त झालेल्या एकूण 13 अहवालांपैकी एका निधन झालेल्या पुरुष व्यक्तीसह एकूण 3 पुरुष व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. युसुफनगर येथील 52 वर्षांची पुरुष व्यक्ती यांना कोविड रूग्णालयात 23 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी 4 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा अहवाल सांयकाळी पॉझिटिव्ह आला. दुसरी पुरुष व्यक्ती बडनेरा येथील असून, 53 वर्षीय आहे.
 
त्याचप्रमाणे, तारखेडा येथील 23 एप्रिलला रोजी निधन झालेल्या महिलेच्या संपर्कातील व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या 33 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोनही व्यक्ती कोविड रुग्णालयात दाखल आहे. असे एकूण पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आता पर्यंत आढळलेल्या एकूण 19 रुग्णांपैकी 6 मयत व्यक्तीसह 9 कोविड रुग्णालयात उपचार घेत असून 4 जणांना सुटी देण्यात आली आहे. युसुफनगर व बडनेरा येथील व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना आयसोलेट करण्याची कारवाई सुरू आहे.
 
अजून 85 अहवालांची प्रतीक्षा
दरम्यान जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून शनिवारी कारोना तपासणी अहवालाचा तपशिल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 930 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 5 हजार 219 संशयीत नागरिकांचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच आजपर्यंत 805 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले, त्यापैकी 694 जणांचे अहवाल निगेटिव्ह व 19 जणांचे पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांवर उपचार सुरू आहे. चार जणांना सुटी देण्यात आली आहे. 85 थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. शनिवारी नवीन 56 नमुने पाठविण्यात आले आहे.