आरोग्य कर्मचारी हे जिल्हयातील खरे फ्रंटलाईन वॉरीअर्स

    दिनांक :25-Apr-2020
|
 

warriors_1  H x
 
 
गडचिरोली,
25 एप्रिल कोरोना संसर्गाच्या धर्तीवर गडचिरोली जिल्हयात बाहेरून आलेल्या प्रवाशांची शोध मोहिम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली. राज्यात संचार बंदी लागू झाल्यापासून आत्तापर्यंत १९ हजार ५०० प्रवाशांची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. यातील प्रत्येक प्रवाशाची दैनंदिन तपासणी गावस्तरीय आशा तसेच आरोग्य सेवकांनी केली. ख-या अर्थाने ते कोराना संसर्ग तपासणीतील फ्रंटलाईन वॉरीअर्स आहेत असे म्हणता येईल. या प्रवाशांची दैनंदिन निरीक्षणे घेण्यासाठी २ हजार २८० आरोग्य कर्मचा-यांनी गावस्तरावर मोहिम राबवून प्रत्येक प्रवाशाचे १४ दिवस निरीक्षण नोंदविले. या २ हजार २८० फ्रंटलाईन वर्कर्सनी ख-या अर्थाने गडचिरोली कोरोनामुक्तीसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. जिल्हयातील हे कोरोना वॉरीअर्स अजूनही आपली सेवा प्रत्येक गावात बजावत आहेत. क्वारंटाईनचा १४ दिवस कालावधी न संपलेल्या जिल्हयातील २ हजार २५० प्रवाशांची दैनंदिन निरीक्षणे घेणे सुरू आहे.
  
आत्तापर्यंत बाहेरून जिल्हयात आलेल्या १९ हजार ५०० प्रवाशांपैकी १७ हजार २२० प्रवाशांचे १४ दिवसांचे निरीक्षण पुर्ण झाले आहे. यातील काही लोकांना खोकला, ताप किंवा श्वसनास त्रास झाल्याने तसेच प्रवाशांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांचे पालन न केल्याने ४६८ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले गेले. यातील संभाव्य ११३ लोकांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले. त्यातील ९४ प्रवाशांना आजपर्यंत घरी सोडण्यात आले आहे. वैद्यकीय निगराणीखाली ठेवलेल्या ११३ पैकी ७८ लोकांचे कोरोना संसर्ग तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. त्यातील ६९ नमुने निगेटीव्ह तर ९ अहवाल अजून येणे बाकी आहेत.