शिकंजात अडकलेल्या बिबट्या ताब्यात

    दिनांक :25-Apr-2020
|
- वनविभागाने केली कारवाई 

bibtya_1  H x W 
 
 
तभा वृत्तसेवा
धारणी, 25 एप्रिल
मध्यप्रदेशातील बनावटीच्या लोखंडी ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याने शिकार्‍याच्या तावडीत येऊ नये म्हणून पळून परतवाडा जवळच्या खैरी गाव शिवारातील एका शेतात शरण घेतली. मात्र यामुळे एकच खळबळ माजलेली होती. वन्यजीव विभाग व परतवाडा प्रादेशिक वनविभागाच्या मदतीने बिबट्याला लगेच पकडण्यात आल्याने मेळघाटात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. मेळघाटच्या जंगलात कोणी व कुठे ट्रॅप लावून ठेवलेला होता, हा आता चौकशीचा विषय आहे.
 
 
जंगलाचा राजा हा पट्टेदार वाघ मानला जातो, तर व्याघ्र राजाचा सेनापती म्हणून बिबट्याला ओळखण्यात येते. 25 एप्रिलच्या सकाळी खैरी गावातून परतवाडा परिक्षेत्राच्या कर्मचार्‍यांनी अमरावतीची रॅपीड रिस पॉस टीम व टी.टी.सी. पथकासोबत घटनास्थळ गाठले. पाहणी केल्यावर बिबट हा मध्यप्रदेश बनावटीच्या लोखंडी शिकंजात अडकलेला दिसला. अडीच वर्षे वयाच्या या बिबट्याचा पाय लोखंडी ट्रॅपमध्ये अडकल्यावरही त्याने जोर लावून लोखंडी ट्रॅपला जमिनीत गाडलेल्या खुट्यासह उखडून पळ काढला. मेळघाटच्या सीमेवरील जंगलात हा ट्रॅप व्यावसायिक शिकार्‍यांनी लावलेला असावा, असा अंदाज आहे. त्याला बेशुद्ध करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी यांची परवानगी घेण्यात आली. वनगुन्हा नोंदविण्याची कारवाई वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलमान्वये करण्यात आली.
 
 
उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, सिपना वन्यजीवचे उपवनसंरक्षक शिवबाला एस., सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, पशुधन अधिकारी डॉ. मिलींद काळे, डॉ. महल्ले, अक्षय घटारे, अमोल गावनेर, मनोज माहुलकर, सतीश उमक तथा पोलिसांनी केवळ तीन तासात बिबट्याला पकडून पायातील ट्रॅप काढून ताब्यात घेतले. आता तज्ज्ञ मंडळी बिबट्याला सुरक्षित कोणत्या जंगलात सोडावे, या विषयावर मंथन करीत आहेत. वाघ पकडून शिकार करण्यासाठी यापूर्वी चौराकुंड व ढाकणा परिक्षेत्रामध्ये असे लोखंडी शिकंजे लावण्यात आलेले होते. हे शिकंजे मूलतः मध्यप्रदेश मध्ये तयार होतात. कमला पारधन प्रकरणात सुद्धा असे लोखंडी शिकंजे वन्यजीव विभागाने आरोपी जवळून हस्तगत केले होते. सध्या लॉकडाऊन असल्याने शिकारी सक्रिय झालेले आहेत.