श्री परशुराम जयंतीनिमित्त अभिषेक व पुजेचे थेट प्रक्षेपण!

    दिनांक :25-Apr-2020
|
- चंद्रपुर-गडचिरोली ब्राह्मण सभेचा अभिनव उपक्रम
 

blood donation_1 &nb 
                 
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सामाजिक दुरावा पाळला जात आहे. टाळेबंदी लागू आहे. धार्मिक कार्यक्रमांना एकत्र येणेही दुरापास्त झाले आहेे. अशाही बिकट परिस्थितीत चंद्रपुर-गडचिरोली ब्राह्मण सभेने एक अभिनव मार्ग शोधला. श्री. परशुराम जयंतीनिमित्त ब्राम्हणसभेच्या कार्यालयात शनिवारी सकाळी पार पडलेल्या अभिषेक व पुजेचा कार्यक्रम थेट ‘फेसबुक लाईव्ह’ करण्यात आला. केवळ चंद्रपूर, गडचिरोलीच नव्हे, तर अवघ्या देशातील समाजबांधवांनी त्याचा लाभ घेतला. त्यानंतर स्वेच्छा रक्तदानाच्या उपक्रमातही सहभागी होऊन ब्राह्मणवृंदाने रक्तदान केले.
 
 
एरवी, श्री परशुराम जयंतीनिमित्त चंद्रपूर महानगरातून भव्य शोभायात्रा निघते. विविध कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव साजरा होतो. पण सध्याची परिस्थितीत वेगळी आहे. तरीही ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून सकाळी 8.30 ते 9.15 पर्यंत समाजबांधवांनी या कार्यक्रमाला त्यांच्या त्यांच्या घरूनच उपस्थितीत दर्शवली. पहिल्यांदाच आयोजित या अभिनव कार्यक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
 
त्यानंतर येथील आयएमए सभागृहात 2 एप्रिलपासून सुरू असलेल्या स्वेच्छा रक्तदानाच्या उपक्रमात सभेचे पदाधिकारी सहभागी झालेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर-गडचिरोली ब्राह्मण सभेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुनील पुराणकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून सृजनचे संस्थापक आशिष देव यांची तसेच अतिथी म्हणून ब्राह्मण सभेचे सचिव रवींद्र दीक्षित, डॉ. किरण देशपांडे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. झेब्रा निसार, प्रकाश धारणे यांची उपस्थिती होती.
 
 
अ‍ॅड. पुराणकर म्हणाले, देशात कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी सरकार आणि जनता संयुक्त लढा देत आहे. देशात टाळेबंदीमुळे धार्मिक आयोजनवर बंदी आहे. भगवान परशुरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने रक्तदानाचा संकल्प करण्यात आला होता. त्यामुळे ब्राह्मवृंदने रक्तदान केल्याचे त्यांनी सांगितले. हे कार्य टाळेबंदीनंतरही होत असेल, तर पुढेही सहकार्य देऊ. रक्त मानवी शरीरातच तयार होते. मानवतेसाठी रक्तदान करणे आपले कर्तव्यच आहे, असेही आवाहन त्यांनी केले.
 
 
यावेळी आशिष देव म्हणाले, रक्तदान हा स्फूर्ती देणारा उपक्रम आहे. सलग 24 दिवस रक्तदान झाले, हे जागरूक समाजाचे प्रमाण आहे. प्रास्ताविक दत्तप्रसन्न महादानी यांनी केले. यावेळी डॉ. किरण देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी भारतमातेचे पूजन करून, कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. अ‍ॅड. पुराणकर, मंगेश भोंबे, योगेश सप्रे, सचिन सांबरे आणि रजत दाबके यांनी रक्तदान केले. संचालन सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले. तर प्रकाश धारणे यांनी आभार मानले.