रस्ते, महामार्गाच्या कामासाठी विस्फोटके उपलब्ध करून देण्यास मुभा

    दिनांक :25-Apr-2020
|
  
explosive _1  H
 
 
वाशीम,
जिल्ह्यात सुरु असलेल्या रस्ते व महामार्गाच्या कामासाठी कठीण खडक फोडण्यासाठी, ब्लास्टिंगसाठी विस्फोटके आवश्यकता असते. त्यामुळे केवळ याच कामासाठी परवानाधारक व्यक्तींना विस्फोटके उपलब्ध करून घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. परवानाधारक विक्रेत्यांनी केवळ परवानाधारक व्यक्तीलाच विस्फोटके उपलब्ध करून द्यावीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच विस्फोटके उपलब्ध करून दिल्यानंतर दुकान बंद ठेवावे लागणार आहे.
 
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात 3 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, तसेच 20 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार सवलत देण्यात आलेले उद्योग, व्यवसायच सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या रस्ते व महामार्गांची कामे सुरु आहेत. या कामामध्ये कठीण खडक फोडण्यासाठी झीलेटीन कांड्या व डेटोनेटर सारख्या विस्फोटकांची आवश्यकता भासते. त्यामुळे परवानाधारक व्यक्तींकडून अशी विस्फोटके उपलब्ध करून घेण्यास मुभा देण्यात आली आहे.
 
 
ब्लास्टिंगचा परवाना असलेल्या व्यक्तींनी विस्फोटक विक्रीचा परवाना असणार्‍या आस्थापनाधारकाशी संपर्क साधून आगाऊ संपर्क साधून विस्फोटके उपलब्ध देण्याबाबत कळवावे. विस्फोटके विक्री करणार्‍या परवानाधारकाने सदर विस्फोटके उपलब्ध करून देण्यापुरती आस्थापना उघडून विस्फोटके उपलब्ध करून द्यावीत व आस्थापना बंद ठेवावी. विस्फोटके वापरण्याचा परवाना असल्याची खात्री विस्फोटके पुरविणार्‍या परवानाधारकाने करणे बंधनकारक आहे. यामध्ये काहीही हलगर्जीपणा, गैरव्यवहार झाल्यास त्याची दखल घेवून विस्फोटक अधिनियम 1984, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.