पोलिसांनी नष्ट केला हजारोंचा दारुसाठा

    दिनांक :25-Apr-2020
|
- भुजवाडा परिसरातील कारवाई

Police destroyed thousand 
 
 
तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
दर्यापूर पोलिसांनी तालुक्यातील भुजवाडा परिसरातील दारू अड्ड्यावर धाड टाकून हजारोंचा दारूसाठा ताब्यात घेत नष्ट केला. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास पूर्ण केली.
 
 
प्राप्त माहितीनुसार, दर्यापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या भुजवाडा परिसरात दारूची अवैधरीत्या निर्मिती होत असल्याची माहिती खबरीद्वारे दर्यापूर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे दर्यापूरचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रिया उमाळे यांनी मनोज दुदंडे, दीपक चव्हाण, रवि जाधव, सुमित इंगळे, रवी हरणे या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला होता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरील जवळपास वीस हजारांचा दारूसाठा जप्त करून घटनास्थळीच नष्ट केला. या कारवाईनंतर अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
दर्यापूर तालुक्यात तीन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू व गुटखा विक्री होत असल्याचे दिसून आले असून लॉकडाऊन काळात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर लॉकडाऊनच्या काळात अमरावतीच्या एलसीबी पथकाने धाड टाकून विविध प्रकारच्या इंग्रजी दारूचा माल जप्त केला होता.