चांदूर रेल्वेत प्रताप अडसड यांची आढावा बैठक

    दिनांक :25-Apr-2020
|

pratap adsal_1  
 
 
तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे,
कोरोना व्हायरसचा सगळीकडे कहर असून 23 मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली, तर 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनला एक महिना झाला असतांना चांदूर रेल्वे तालुक्यातील आरोग्याची स्थिती, पाणी टंचाई आणि खरीप हंगामासाठी बियाणे व खते यांची स्थिती यासह अनेक प्रश्नाचा आढावा चांदूर रेल्वे - धामणगाव विधानसभेचे आमदार प्रताप अडसड यांनी शुक्रवारी दुपारी स्थानिक तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजित सभेमध्ये घेतला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत व महत्वाच्या अधिकार्‍यांना या सभेला बोलावून आढावा सभा घेण्यात आली.
 
 
आढावा सभेला आ. प्रताप अडसड, तहसीलदार राजेंद्र इंगळे, चांदूर रेल्वे पं.स. सभापती सरिता देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल यांनी माहिती दिली. त्यानुसार, पहिल्या सर्व्हेमध्ये 666 वेगवेगळ्या आजाराची लक्षणे होती. त्यापैकी 9 व्यक्तींना जुनाट आजार असले तरी त्यांचा प्रवासाचा इतिहास नव्हता. तर दुसर्‍या आरोग्य सर्व्हेमध्ये 604 मधून 325 मध्ये विविध आजारांची लक्षणे आढळली. त्यापैकी 177 चा पाठपुरावा आरोग्य विभागाने केला. चांदूर रेल्वेत कोविड सेंटर व क्वारंटाईन सेंटर असून नांदगाव खंडेश्वर येथे कोविड हेल्थ सेंटर असल्याचे डॉ. जयस्वाल यांनी सांगितले. कामे सुरू करतांना बाहेरगावावरून आलेल्या मजुरांची यादी टीएमओ ऑफीसकडे द्यावी, अशी डॉ.जयस्वाल यांनी सूचना मांडली. आ. अडसड यांनी तालुक्यातील आरोग्य विभागासाठी सीएसकडे 50 लाखाची मागणी केली. परंतु आता केवळ 10 लाख मिळणार असून त्यापैकी दीड लाख प्रत्येक पीएचसीला देता येईल, असे आ. अडसड यांनी सांगितले.
 
 
तालुका कृषी अधिकारी सुरेखा जाधव यांनी खरीपासाठी बियाणे व खताची मागणी केली असून 5 मे पर्यंत सर्व साठा तालुक्याला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला. तसेच पीक विमा व अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत काहींचे चुकीचे खाते क्रमांक असल्याने पैसे परत गेले व ते दुरूस्त करून त्यांना परत पाठविल्याचेही त्यांनी सांगीतले. कर्जमाफी व नवीन कर्जाची प्रक्रिया त्वरित करा, तसेच शेतकर्‍यांच्या घरातील शेतमालाची विक्री नाफेड व सीसीआय मार्फत पर्यंत सुरू करा, असे पत्रकारांनी सुचविले. या बैठकीत पाणीटंचाईच्या समस्यांवर भरपूर चर्चा होऊन उपस्थितांनी काही उपायही सुचविले. स्वस्त धान्य वाटपाच्या स्थितीबाबत चर्चा झाली. राशन वाटप समितीमध्ये सरपंच, पोलिस पाटील व शिक्षकांना घ्या, मदतीसाठीचे धान्य जमा करून लॉकडाऊन वाढल्यास पुढे वाटप करा, असे निर्देश प्रताप अडसड यांनी दिले.
 
 
शिवभोजन कंत्राटाची पोलिसांत तक्रार करा
शहरातील शिवभोजन थाळी केंद्राचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. सर्व पुरावे असूनही प्रशासन कारवाईसाठी विलंब करीत असतांना प्रशासनाच्या या कारभाराविषयी आमदार प्रताप अडसड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात बोगस कागदपत्रे सादर करणार्‍या त्या कंत्राटदाराविरूध्द थेट पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करा, तक्रारीकरिता जिल्हाधिकार्‍यांचे मार्गदर्शन लागत नाही, असे म्हणत स्पष्ट निर्देश आमदार प्रताप अडसड यांनी शुक्रवारी आढावा बैठकीतून दिले.