बेंबळा बु. येथे तीव्र पाणीटंचाई

    दिनांक :25-Apr-2020
|
- गावकरी नदीत खड्डे खोदून नेत आहे पाणी
 
Bembala Bu. Severe water  
 
 
तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
तालुक्यातील खल्लारपासून जवळच असलेल्या बेंबळा बु. येथे मजीप्राकडून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून गावात पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावकर्‍यांना कोरड्या नदीपात्रात खड्डे खोदून त्यातील दूषित पाणी न्यावे लागत आहे. याबाबत महाराष्ट जीवन प्राधिकरण दर्यापूर तसेच अंजनगाव सुर्जी येथे गावाच्या सरपंचांनी कित्येक वेळा निवेदन देऊन सुद्धा कसल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. मजीप्राने गावातील योजना खाजगी ठेकेदारीत दिली असून कोणत्याही तक्रारीवर दखल न घेता ठेकेदार नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरतो, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.
 
 
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणी अत्यावश्यक आहे. परंतु बेंबळा बु. गावात गेल्या दोन वर्षांपासून नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात आहे. गावात पाईपलाईन असून त्याचा काहीच उपयोग होतांना दिसत नाही. काहींना पाणी आणि बाकी सर्व ताहानलेले अशी परिस्थिती गावात निर्माण झाली आहे. संचारबंदीच्या काळात भर उन्हात पाण्याकरिता गावकर्‍यांची भटकंती सुरू झाली आहे. काही नागरिक जवळच असलेल्या मशीदमधून बोअरवेलच्या पाण्याचा वापर करीत आहेत, तर काही गावकरी बैलबंडीने बाहेर गावातून पाणी आणत आहेत. ज्यांच्याकडे पाणी आणण्याचे साधन नाही, असे नागरिक नदीतील घाण पाणी आणून आपली ताहान भागवत आहेत. गावाचे सरपंच अशोक चिकटे यांनी मजीप्रा दर्यापूर तसेच अंजनगाव सुर्जी कार्यालयात भयंकर पाणी टंचाईबद्दल लेखी निवेदन दिले. परंतु सरपंचांना मजीप्राच्या दोन्ही उपविभागीय कार्यालयाकडून उडवा-उडवीचे उत्तरांना सामोरे जावे लागले. बेंबळा बु. गावाची लोकसंख्या दोन हजारच्या जवळपास असून गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी पुरविण्याचे जबाबदारी आहे. अधिकारी आणि ठेकेदार मानमानी पद्धतीने काम करीत असून भर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईने ग्रामस्थ ग्रासले आहेत. यावर कोणतीही उचित कारवाई न करता मजीप्रा हातावर हात ठेवून बसल्याचे चित्र आहे. सदर प्रकाराने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.