पंतप्रधान कार्यालयाने घेतली वर्धेच्या रोटरी बाजाराची दखल

    दिनांक :25-Apr-2020
|

narendra modi_1 &nbs 
 
 
तभा वृत्तसेवा
वर्धा,
वर्ध्यात गेल्या अनेक वर्षांपासून बजाज चौकात सुरू असलेला भाजी बाजार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अन्यत्र हलविण्या आलेला भाजी बाजाराने हळूहळू आदर्श बाजाराचे रूप घेतले. काल दिवसभर राज्यात वर्धेतील बाजाराची फेसबूक, व्हॉट्अ‍ॅप, इंस्टाग्रामवरून चर्चा होत असताना पंतप्रधान कार्यालयानेही फेसबूक पेजवरून दखल घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी वर्धा रोटरी क्लबने केलेला उपक्रम अमरावती येथे राबवावा, अशी पोस्ट फेसबूकवरून अमरावती जिल्हा प्रशासनाला केली आहे.
 
 
 
वर्धेत बजाज चौकात असलेल्या भाजी बाजारातील गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून सोशल डिस्टन्सला घेऊन बजाज चौकातील मोठा भाजी बाजार आणि गोल बाजारातील भाजीचे दुकानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि स्वावलंबी शाळेच्या मैदानावर हलविण्यात आले. डॉ. आंबेडकर चौकातील भाजीसाठी असलेली गर्दीत सोशल डिस्टन्सचा विषय येऊ लागल्याने भाजी आणि फळ बाजार अन्यत्र लावण्यावर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, नपचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, तहसीलदार प्रीती डुडूलकर यांनी शहरातील काही सामाजिक संघटनासोबत चर्चा केली. दरम्यान, रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीच्या मदतीने केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर 24 पासून नगर पालिकेचा भाजी बाजार सुरू करण्यात आला. त्यासाठी रोटरीने मनुष्यबळ, साहित्य आणि नियोजन करून दिले.
 
 
रोटरी उत्सवात ज्या प्रमाणे शिस्तबद्धपणे कार्यक्रम राबवला जातो तसे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या मदतीने रोटरीने केले. 72 भाजी आणि फळ दुकानाची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक भाजी दुकानात सॅनिटायझर ठेवण्यात आले असून ग्राहकांना सोशल डिस्टन्सने बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दर दहा मिनिटांनी नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी संपूर्ण पटांगण झाडत असल्याने बाजारात कुठेही कचरा पडलेला दिसून येत नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा आगळावेगळा प्रयोग करताना बाजारात येणार्‍याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कमान, मैदानाच्या मध्यभागी एक डायस तयार करून या भाजी बाजाराचे इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचे काम रोटरीने केले. कालपासून सुरू झालेल्या वर्ध्याच्या या रोटरीच्या बाजाराला समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाच्या फेसबूक पेजवरही वर्ध्यातील या नियोजनबद्ध भाजी बाजाराची दखल घेतल्या गेली आहे. विशेष म्हणजे वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या केसरीमल कन्या शाळेचे मैदान नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. जगात कोरानाचे संकट आले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी कोरोनासोबत लढण्यासाठी सर्व उपाय योजना केल्या आहेत. या सामाजिक उपक्रमात आमच्या शैक्षणिक संस्थेचा सहभाग देता आला. आमच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आम्हाला सामाजिक दायित्वाचे शिक्षण देता येईल, अशी प्रतिक्रिया वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माधव पंडित यांनी दिली.
 
 
कौतुकास्पद कार्य 
कोरोना संसर्गात मदत करण्यासाठी रोटरी सामाजिक संघटना पुढे आली आहे. जिल्हा प्रशासनासह ते आरोग्यासाठी जी काही मदत लागते ती देण्यासाठी कायम पुढे आहे. वर्ध्यात सॅनिटायझर सेंटर सुरू करण्यासाठी वर्धा नपने सुरुवात केल्यानंतर रोटरीनेही शहरात ठिकठिकाणी हॅण्डवॉश सेंटर तयार केले. काही ठिकणी सॅनिटायझर बोगदे तर सेवाग्राम रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी युनिट तयार करून दिले. आता केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भाजी बाजाराला आपण स्वत: भेट दिली. अतियश शिस्तबद्ध आणि भाजी ग्राहकांना बसण्यासाठी दिलेल्या खुर्च्या, प्रत्येक दुकानादाराजवळ सॅनिटायझर या गोष्टी इतर ठिकाणी कुठेही आढळून आलेल्या नाहीत. सर्वांच्या मदतीनेच वर्धा जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यात यश मिळाले असल्याचे जिल्हाधिकारी भीमनवार यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.