लढाई अजूनही संपलेली नाही, एकत्रित प्रयत्नांची गरज

    दिनांक :25-Apr-2020
|
- पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांचे आवाहन 

yashomati thakur_1 & 
 
तभा वृत्तसेवा
अमरावती,
एकीकडे चार रूग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची दिलासादायक बातमी असताना दुसरीकडे पुन्हा नव्याने चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लढाई अजूनही संपलेली नाही, कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही स्वत:हून माहिती देण्यासाठी व तपासणीसाठी पुढे यावे. कुठलीही माहिती दडवू नये, असे आवाहन पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही शहरात प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
 
पालकमंत्री ठाकूर रोज जिल्हा प्रशासनाकडून माहिती व आढावा घेत आहेत. येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याने त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्याबाबत पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, रूग्ण बरे होऊन घरी परतत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, पुन्हा नव्याने चार रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, ही चिंता वाढविणारी बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.
 
 
सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या पवित्र दिवसांत त्यांनी इफ्तार आदी कार्यक्रम घरातच साजरे करून सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर कोरोनासारखे कुठलेही संकट येऊ नये म्हणून मुस्लीम बंधू-भगिनींनी मशिदीमध्ये एकत्र न येता, आपल्या घरीच सोशल डिस्टन्सिंग पाळून नमाज अदा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
 
 
लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीत दिलेली शिथीलता जरी रद्द केली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठ्यात कुठलीही कमतरता येऊ नये, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल आदी सुरुच राहणार आहेत. जिल्ह्यात गोरगरीबांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून सुरळीत नियोजनातून अन्नधान्याचा पुरवठा सुरु आहे. त्याशिवाय, संचारबंदीच्या काळात शेतकर्‍यांनी पिकविलेला भाजीपाला, फळ, शेती पिक उत्पादित माल ग्राहकांच्या घरपोच पोहचता व्हावा, यासाठी कृषी विभागाने सुरळीत नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी ते ग्राहक अशी योजना राबविल्याने मध्यस्थी टळेल, सुरक्षितता राखली जाईल व शेतकर्‍यांनाही त्याचा लाभ होईल. त्यानुसार ग्राहकांना शेतीतील उत्पादित ताजा माल घरपोच मिळू शकेल. कृषी विभागाने यात लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
डॉक्टर व पोलिसांसाठी ध्यानधारणा प्रशिक्षण
अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोविड रुग्णालयात सेवा दिलेले व सध्या क्वारंटाईन असलेल्या डॉक्टर आणि पोलिसांसाठी ध्यान धारणा प्रशिक्षण येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीत शुक्रवारी सकाळी आयोजित करण्यात आले होते. पालकमंत्री ठाकूर यांनी स्वतः या सर्वांसह ध्यानधारणेत भाग घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम सुद्धा यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षक शिवाजी कुचे यांनी यावेळी सकारात्मक विचार, साक्षीभावाचे महत्त्व व ध्यानसंगीत प्रात्यक्षिकातून ध्यानधारणेची अनुभूती सर्वांना दिली. सहायक प्राध्यापक पंकज शिरभाते, व्यवस्थापक अमोल कोंडे, आदी यावेळी उपस्थित होते.