दोन महिन्यातच थुगावच्या डांबरी रस्त्याची दुर्दशा

    दिनांक :25-Apr-2020
|
- प्रहारच्या निवेदनानंतर अधिकार्‍यांकडून पाहणी 
 
thugav road_1  
 
 
तभा वृत्तसेवा
नांदगाव पेठ,
दोन महिन्यांपूर्वी बनलेल्या थुगाव फाटा ते थुगाव या डांबरी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून याबाबत दोन दिवसांपूर्वी प्रहारने दिलेल्या निवेदनानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकार्‍यांनी दुसर्‍याच दिवशी रस्त्याची पाहणी केली.
 
 
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन महिन्यांपूर्वी थुगाव फाट्यापासून गावापर्यंत डांबरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र काही दिवसातच रस्ता उखडला व अनेक ठिकाणी खड्डे देखील पडले. पावसाळ्यात रस्त्यावरील डांबर वाहून जाण्याची दाट शक्यता असून पुन्हा रस्ता खराब होणार असल्याने थुगाव येथील प्रहारचे शाखा प्रमुख अविनाश गवई, श्रीकांत चौधरी यांनी तालुकाध्यक्ष जोगेंद्र मोहोड यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे मुख्य कार्यकारी अभियंता खान यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने खान यांनी उद्याच अधिकारी पाठविण्याचे आश्वासन देखील दिले होते. दुसर्‍याच दिवशी अधिकार्‍यांनी रस्त्याची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला.