जिल्हाधिकारी मोडक यांच्या कुशल नेतृत्वाने कोरोना लढाईस दिले बळ

    दिनांक :25-Apr-2020
|
 
hrishikesh modak _1 
 
 
चंद्रकांत लोहाणा
वाशीम,
नोव्हेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान येथुन उदयास आलेल्या कोरोना विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले. भारत देशातही या विषाणूने चांगलेच पाय पसरवले. या आजारावर मात करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलली. 24 मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा केली. तरीही भारतात या विषाणूचे आजपर्यंत 23 हजार रुग्ण झाले असून, महाराष्ट्रात सर्वाधिक 6 हजारावर रुग्णांचा समावेश आहे. वाशीम जिल्हा प्रशासनाने वेळीच घेतलेल्या कठोर निर्णयाचे फलित म्हणुन वाशीम जिल्हा आज रोजी कोरोना मुक्त होऊन ग्रीन झोनमध्ये आला आहे.
 
 
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही कठोर निर्बंध घातले. जीवनावश्यक वस्तूची प्रतिष्ठाने वगळता सर्वच कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. वाशीम जिल्ह्यातही केंद्र व राज्य शासनाने सुचविलेल्या अटी व नियमाचे तंतोतत पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, आरोग्य विभागाचे वतीने जिल्हा शल्यचिकीत्सक अंबादास सोनटक्के, जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले. पोलिस प्रशासनाने देखील शहर व ग्रामीण भागात पेट्रोलिंगच्या माध्यमातून रस्त्यावर जमाव होऊ नाही याची खबरदारी घेतली. जिल्हाधिकारी मोडक यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करुन बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून येणारी रहदारी बंद केली. जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, लग्न सोहळे, सामाजिक कार्यक्रमावर बंदी घातली.
 
जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुध्दा डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश अहेर, यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ. ससे, जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, डॉ. अनिल कारखे, डॉ. संजय नांदगावकर, संजय वानखडे, पवन आरमाड यांनी कोरोना आजावर फैलाव होवू नाही यासाठी अविरत सेवा दिली. जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे ठाणेदार व त्यांच्या सहकार्‍यांनी शहरातील चौकाचौकात व ग्रामीण भागात पहारा दिला. भाजी बाजार, किराणा बाजार याठिकाणी सुध्दा आपले कर्तव्य बजावत लोकांना सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्या मार्गदर्शनात आरोग्य कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, ग्रामीण पातळीवर ग्रापचे अधिकारी, कर्मचारी, प्राथ. आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी नियम व अटीची प्रभावी अमंलबजावणी केल्यामुळेच वाशीम जिल्हा आज ग्रीन झोन मध्ये आला आहे.
 
 
वाशीम जिल्ह्यात दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात सहभागी झालेला एकमेव व्यक्ती पॉझीटीव्ह होता. त्या व्यक्तीवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डात उपचार करण्यात आले. 14 दिवसानंतर त्या व्यक्तीचा दोन पैकी एक अहवाल निगेटीव्ह व एक पॉझीटीव्ह आला. त्यानंतर पुन्हा पाच दिवसाने त्या व्यक्तीच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यानंतर ते दोन्ही अहवाल निगेटीव्ह आले आणि वाशीम जिल्हा कारोनामुक्त झाला. याचे सर्व श्रेय जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व कर्मचारी, पोलिस प्रशासन यांच्या कठोर परिश्रमाचे फलीत आहे. खरच जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्वच टीम ने कोरोना बचावासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
 
 
जिल्हाधिकारी यांचे परिश्रम फळाले
वाशीम येथील जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी या जिल्ह्यावर अहोरात्र मेहनत घेऊन करडी नजर ठेवली. लॉकडाऊन दरम्यान केंद्र शासनाच्या प्रत्येक निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करून कोरोनाला जिल्ह्याबाहेर रोखले. कोरोनाशी दोन हात करून या लढाईत जिंकायचेच हा प्रण करूनच जणु जिल्हाधिकारी रणांगणात उतरले होते. आईच्या ममत्वाने जस बाळ यशोशिखर गाठत तसेच या युध्दात जिल्हाधिकारी मोडक यांच्या नेतृत्वात यशाचे मानकरी ठरले आहेत, सर्व फ्रंटलाईन वॉरीअर्स.