साऊर येथे गावातच भरला आठवडी बाजार

    दिनांक :25-Apr-2020
|
- लॉकडाऊनचे झाले उल्लंघन 
 
takarkheda sambhu_1 
 
तभा वृत्तसेवा
टाकरखेडा संभू, 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश दिले आहेत. अशातच गावागावात भरणारे आठवडी बाजार देखील बंद करण्याचे आदेश असताना भातकुली तालुक्यातील साऊर येथे शनिवारी गावातच आठवडी बाजार भरला. त्यामुळे शेकडो नागरिक एकत्र आले होते. यामुळे शासनाच्या लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्याची चांगली चर्चा येथे सुरू होती.
 
 
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे सर्वच शासकीय, निमशासकीय सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सण-उत्सव देखील रद्द करण्यात आले असताना गावात भरणार्‍या आठवडी बाजारावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या 16 वर गेल्याने काही नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. अशाही परिस्थितीत भातकुली तालुक्यातील साऊर येथे शनिवारी आठवडी बाजार भरला. यावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण नाही का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यामुळे प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाल्याची चर्चा गावात सुरू होती.