जुळ्या शहरात दुचाकी गाड्यांचीही वाहतूक बंद

    दिनांक :25-Apr-2020
|
- अचलपूर, चांदुरबाजार तालुके संवेदनशील
 

bike_1  H x W:  
 
तभा वृत्तसेवा
अचलपूर,
अमरावती शहरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासन कडक निर्णय घेत असून जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार उद्या रविवार, 26 एप्रिलपासून अचलपूर, परतवाडा शहरात दुचाकी वाहन वापरण्यावरही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. केवळ सायकल वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
 
 
अचलपूर, परतवाडा शहरापासून अमरावती शहर जवळ आहे. त्यामुळे अमरावती शहराची परिस्थिती बघता जुळ्या शहरातही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. अचलपूर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार परतवाडा व अचलपूर शहरात दुचाकी वाहन कोणी वापरत असतांना आढळल्यास वाहन जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय व बँक कर्मचारी , दुध व्यवसायिक, वैद्यकीय उपचारासाठी जाणारी व्यक्ती, औषधी दुकानदार, वैद्यक व्यवसायी, स्टाफ, वृत्तपत्र वितरण करणारी व्यक्ती, अधिस्वीकृतीधारक माध्यम प्रातिनिधी यांना परवानगी असेल. परंतु त्या दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करेल. या खेरीज इतर कोणी व्यक्ती दुचाकीवर आढळल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई पोलिस प्रशासनामार्फत होणार आहे. सायकल चालवणार्‍यांना या नियमातून सुट देण्यात येणार आहे.
 
 
तसेच जुळ्या शहरात चांदुर बाजार नाका, विर्दभ मिल स्टॉप, बस स्टँड, जयस्तंभ चौक, एल.आय.सी. चौक, बैलगाडी चौक, अंजनगाव स्टॉप, रेस्ट हाऊस चौक, टिळक चौक, दुरानी चौक, अशा दहा ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी येणार्‍या सर्व वाहनांची तपासणी होणार असून वाहनातील व्यक्तीची आधार कार्ड, ओळखपत्राद्वारे ओळख पटवून त्यांची रजिस्टरमध्ये नोंद होणार आहे. नगर परिषद हद्दीत कोणत्याही कारणाने कोणाचा मृत्यू झाला असल्यास नगर परिषदेला त्वरित माहिती द्यावी तसेच अत्यसंस्कार हा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करावा. सदर सुचनांचे पालन न केल्यास कुटुंबप्रमुखावर भा. द.वि. चे कलम 188नुसार गुन्हा दाखल होईल. वरील आदेश हा 3 मे पर्यंत राहील, असे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी स्पष्ट केले आहे.