सीमावर्ती भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :25-Apr-2020
|
- तेलंगणातून येणार्‍यांची माहिती कळवा

chandrapur border_1 
 
 
तभा वृत्तसेवा
गोंडपिपरी, 
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेले मजूर आता परतीच्या पायवाटेने राज्यात प्रवेश करीत असून, कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सीमावर्ती भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगून परराज्यातून पायी येत असलेल्या व्यक्तींची माहिती वेळीच कळवावी, असे आवाहन धाबा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुशील धोकटे व लाठी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप कुमार राठोड यांनी केले आहे.
 
 
पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र राज्यातून अनेक मजूर विविध राज्यांमध्ये कामासाठी गेले आहेत. सीमावर्ती भागासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचे मजूर हे मिरची तोडण्यासाठी तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात नेहमी जात असतात. अशातच कोरोना या महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना, उद्भवलेल्या टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे हजारो नागरिक तिकडेच अडकलेत. टाळेबंदीमध्ये संपूर्ण राज्याच्या सीमा तसेच जिल्हा सीमा बंद केल्याने परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांना आता कामाअभावी व तेथील प्रशासन अन्नधान्याची पूर्तता करीत नसल्याने कारण सांगून आता परतीची वाट धरत आहे.
 
 
गोंडपिपरी तालुका हा राज्य सीमेवर वसलेला असून, या तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. तेथे अडकलेले बहुतांश मजूर आता सीमावर्ती भागातून महाराष्ट्र राज्यात परत येत आहे. हे मजूर शेकडो किलोमीटर अंतर पायदळ प्रवास करीत विविध जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येत आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यात बहुतांश जिल्हे हे कोरोना बाधित ‘रेड झोन’मध्ये असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आता गोंडपिपरी तालुक्यातील सीमावर्ती भागातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य समजून ‘मीच माझा रक्षक’ हे ध्येय अंगीकारून पलीकडल्या राज्यातून येणार्‍या मजूर व नागरिकांवर पाळत ठेवून याची त्वरित माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सुशील धोकटे व प्रदीप कुमार राठोड यांनी केले आहे.