शोभाताईंना पंतप्रधानांचा फोन येतो तेव्हा...!

    दिनांक :25-Apr-2020
|
- तब्येतीची चौकशी केली आणि कोरोनाची स्थिती विचारली

shobhatai fadnavis_1  
 
 
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना शुक्रवारी त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. पलीकडच्या व्यक्तीने श्रीमती शोभाताई फडणवीस बोलत आहात का, याची खात्री केली आणि सांगितले, आपल्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू इच्छितात! हे ऐकून फडणवीस यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पंतप्रधान आपल्यासोबत काय बोलतील, या विचारात असतानाच समोरून एक आश्वासक आवाज ऐकू आला. ताई कश्या आहात?
 
कोरोनाच्या संकटाचा सामना भारत करीत आहे. या गंभीर परिस्थितीतही पंतप्रधान मोदी यांनी वेळात वेळ काढून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करुन विचारपूस करावी, हा अनुभव विलक्षण असून, मी माझे सौभाग्य समजते, असे शोभाताई फडणवीस म्हणाल्या. एकदा भेटण्याची इच्छाही शोभाताई फडणवीस यांनी मोदींकडे व्यक्त केली. त्यावर मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.
 
देशावर कोरोनाचे संकट आहे पण, आपल्याला यातून देशाला बाहेर काढायचे आहे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, असे मोदी यांनी शोभाताई फडणवीस यांना सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही सकारात्मक रूग्ण नाही. जिल्हा प्रशासन सतर्कतेने काम करीत असून, ग्रामस्थही दक्षता घेत आहेत. गरजवंतांना मदत पोहचली जात असल्याची माहितीही शोभाताई फडणवीस यांनी यावेळी मोदींनी दिली. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अगदी काटेकोरपणे कोरोनाच्या युद्धात लढा देत असल्याचेही शोभाताई फडणवीस यांनी त्यांना सांगितले.