चंद्रपूरात कोरोना ‘व्हिआरडीएल लॅब’ सुरू करा

    दिनांक :25-Apr-2020
|
- हंसराज अहीर यांची मागणी

hansaraj ahir_1 &nbs 
 
 
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
कोवीड-19 विषाणूचे संकट संपूर्ण देशात असताना दुर्देवाने महाराष्ट्रात कोरोना सकारात्मक रुग्णांची संख्या सर्वात अधिक असून, महाराष्ट्र व अन्य राज्यातील कोवीड चाचणी करण्याकरिता सद्यास्थितीत सुरू असलेल्या ‘व्हिआरडीएल लॅब’वरती अधिक बोझा वाढत आहे, हे सर्वश्रूत आहे. असे असताना चंद्रपूर येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर येथे व्हिआरडीएल लॅब सुरू करा, अशी मागणी खुद्द हंसराज अहिर यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिशदेच्या (आयसीएमआर) महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. 
 
सुदैवाने, चंद्रपूर जिल्हयात सकारात्मक रूग्ण नसून, जिल्हा ग्रीन झोन मध्ये समाविष्ट असल्याने चंद्रपूर येथे सुरू असलेले ‘हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर’ हे नजीकच्या यवतमाळ व गडचिरोली जिल्हयातील कोवीडची चाचणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त व सोईस्कर ठरू शकते, असेही अहीर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. चंद्रपूरात काही वर्षांपासून सुरू असलेल्या या ‘हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर’मध्ये अनुभवी कर्मचारी सदस्य असल्याचेही अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 
 
कोवीडचे सर्वांधिक रूग्ण महाराष्ट्रात आहे व नजीकच्या नागपूर व यवतमाळ येथे दिवसेंदिवस रूग्णांची वाढ होत आहे. असे असताना नागपूर, यवतमाळ, गडचिरोली व अन्य जिल्हयातील चाचण्या करण्यासाठी चंद्रपूर येथील ‘हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर’ हा कोवीड चाचणीसाठी एक उत्तम पर्याय असल्याचे सांगत येथे ‘व्हिआरडीएल लॅब’ सुरू करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी अहीर यांनी केली आहे. असे झाल्यास कोवीड रूग्णांच्या चाचणीमध्ये अधिक वेग तर येईलच सोबतच कोवीड वर मात करण्यासाठी ही भरीव मदत होईल, असा विश्वास हंसराज अहिर यांनी व्यक्त केला आहे.