दिव्यांग व्यक्तींकरीता जिल्हा परिषदेची 19 लाखाची तरतुद

    दिनांक :26-Apr-2020
|
- कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना
- लाभार्थ्यांनी पंचायत समितीस्तरावर अर्ज करावे: चंद्रकांत ठाकरे
 
 
chandrakant thakre_1 
 
वाशीम,
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभर लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींकरीता जिवनावश्यक वस्तुसाठी जिल्हा परिषदेने 19 लाख 20 हजार रुपायाची तरतुद केली असून, पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समितीस्तरावर अर्ज करण्याचे आवाहन जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे.
 
 
ग्रामिण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यासाठी जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे परिश्रम घेत आहेत. नुकताच जिल्हा परिषदेच्या शेष फंडातुन कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 26 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. प्रति सर्कल 50 हजार याप्रमाणे 52 सर्कल करीता एकुण 26 लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना जिवनावश्यक वस्तुकरीता 19 लाख 20 हजार रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ग्राम पंचायतींनी 5 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना जिवनावश्यक वस्तुकरीता खर्च करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधी मध्ये शिल्लक असलेला 19 लाख 20 हजार रुपयाचा निधी दिव्यांग व्यक्तींना 50 टक्के वैयक्तिक व 50 टक्के सामुहिक पातळीवर वितरीत करण्यात येणार आहे. याकरीता लाभार्थींनी तालुका स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांनी केले आहे.
 
 
आशा, अंगणवाडी सेविका व ग्राप कर्मचारी यांना 34 लाख रुपये प्रोत्साहन भत्ता वितरीत
ग्राम स्तरावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, आशा वर्कर आणि केंद्रचालक अशा एकुण 3 हजार 489 कर्मचार्‍यांना प्रत्येकी 1 हजार रुपया प्रमाणे जिपच्या वतीने 34 लाख 68 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता वितरीत करण्यात आला आहे.