सीसीआय व फेडरेशनची कापूस खरेदी त्वरित सुरू करावी

    दिनांक :26-Apr-2020
|
- आमदार पाटणी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 

patni_1  H x W: 
 
 
कारंजा लाड, 
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी सुरु करण्याचे आदेश 20 एप्रिल रोजी निर्गमित केले. कापूस खरेदी केंद्राशी निगडीत अटीनुसार मार्च व एप्रिलच्या निकषात फारमोठी तफावत असल्यामुळे कापूस खरेदी केंद्र कपाशीची खरेदी करताना दिसत नाही. करारनाम्यातील अटी व शर्ती शिथिल करण्यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली असून, तशा प्रकारचे आदेश काढण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळवावे अशी विनंती केली आहे.
 
 
वाशीम जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाकडे मार्च महिन्यापासून कापूस शिल्लक आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरु करण्याचे आदेश 20 एप्रिल रोजी निर्गमित केले आहे. परंतु कापूस खरेदी केंद्रासोबत झालेल्या करारनाम्यात दिलेल्या अटीनुसार मार्च व एप्रिलमध्ये कापूस खरेदी करावयाच्या निकषामध्ये फरक असल्याने कापूस खरेदी केंद्र कापूस खरेदी करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये रुईचा उतारा 34.10 होता व घट 2.25 टक्के होती, ती एप्रिल महिन्यामध्ये 34.60 व घट 2 टक्के आहे, राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्याने मार्च पूर्वीपासूनच शेतकरी वर्गाकड मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. जर हा कापूस खरेदी केंद्राने एप्रिलच्या निकषानूसार खरेदी केला तर यातील तफावत खरेदीदाराकडून वसुली होणार असल्याने जिल्हयात कापूस खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत.
 
 
करारनाम्यातील अटी शिथिल करुन एप्रिल आणि मे महिन्यात होणारी खरेदी मार्चच्या कापूस खरेदीच्या अटी नूसार खरेदी करण्यासाठी संबंधीत विभागाला आदेशीत करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे. याबाबत त्यांनी कृषीमंत्री दादाजी भूसे, पालकमंत्री शंभुराजे देसाई, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य सचिव, सचिव कृषि, सचिव पणन, आयुक्त अमरावती तसेच जिल्हाधिकारी वाशीम यांना केली आहे.