जिल्ह्यावर कोरोनाची टांगती तलवार; अधिकारी गेले सुटीवर

    दिनांक :26-Apr-2020
|
arjuni mor _1   
 
 
सुरेंद्रकुमार ठवरे  
अर्जुनी-मोर, 
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून कोरोना केअर सेंटर तयार केले आहेत. तेथे नोडल ऑफिसरची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.  मात्र, कोरोना महामारीच्या परिस्थितीही अर्जुनी-मोर तालुक्यातील एरंडी येथील काळजी केंद्राचे नोडल ऑफिसर तसेच अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अकिनवार हे अर्जित रजेवर गेले आहेत.
 
 
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवा बजावणारे आपल्या कर्तव्यापासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अकिनवार हे देशात लॉकडाउन झाल्यापूर्वीही आपल्या कर्तव्याला चुकले होते. तालुका प्रशासनाने ही बाब प्रशासनाला कळविली होती. मात्र, या अधिक्षकांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या वैद्यकीय अधिक्षकांचे मनोबल अधिकच उंचावले आहे. परत तशीच कृती त्यांच्याकडून करण्यात आली आहे. यामुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
 
 
ग्रामीण रुग्णालयांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तर पांगळीच झाल्यासारखी आहे. त्यांना जनतेच्या आरोग्याची सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. आपले कामाचे तीस दिवस पूर्ण झाले की पगार मिळतोच, अशी मनोवृत्ती ठेवणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे काही अधिकारी पत्रकारांच्या भ्रमणध्वनीला साधा प्रतिसादही देत नाहीत.
 
सध्या सर्वत्र जिल्हा सीमा बंदी आहे, असे असताना डॉक्टर मुख्यालय सोडून नागपूरला गेले आहेत. नागपूर सध्या 'रेड झोन'मध्ये असल्याने बाहेरून गावात येणाऱ्या सामान्य इसमाला क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करत ते रजेवरून परत येतील तेव्हा सुद्धा त्यांना क्वारंटाईन केले पाहिजे. सर्वांसाठी एक सारखेच नियम असतात हे दाखवून देण्याचे धाडस जिल्हा प्रशासन करेल काय असा प्रश्न चर्चिला जात आहे.