वैद्यकिय अधिकारी कोरोना रेडझोन जिल्ह्यातून करतात ये-जा

    दिनांक :26-Apr-2020
|
- कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कारवाईची गरज
 
 
coronavirus_1  
 
 
कारंजा लाड, 
एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रूग्णांवर उपचार करणार्‍या कारंजा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारीच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
प्राप्त माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात 25 मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून, 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदीचे पालन व उपाययोजनांमुळे राज्यात वाशीम पॅटर्न एक आदर्श म्हणून पुढे आला आहे. अशा परिस्थितीत कारंजा उपजिल्हा रूग्णालयातील कार्यरत वैद्यकिय अधिकारी जयंत पाटील व मधुकर मडावी हे मात्र, कोरोनाचा रेडझोन असलेल्या यवतमाळ व अकोला जिल्ह्यातून कारंजा येथे ये जा करीत आहेत. डॉ पाटील व डॉ मडावी यांच्या येजा करण्याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांची ही येजा थांबविण्याची गरज आहे. यावरून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे तसेच कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या संपर्कात न येणे असा सल्ला देणार्‍या कारंजा उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यातून होणारी डॉक्टरांची येजा म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान मात्र आपण स्वतः कोरडेपाशान असेच म्हणावे लागेल.