...तर कामगारांचे पलायन थांबेल : नितीन गडकरी

    दिनांक :26-Apr-2020
|
नागपूर, 
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यामुळे महिनाभरापासून सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. परिणामी कामानिमित्त दुसऱ्या राज्यांमध्ये राहणारे मजूर लॉकडाउनमुळे अडकून पडले आहेत. तर काही मजूर पायी अथवा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी स्वराज्यातील कामगारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून, या कामगारांना आहे, तिथेच राहु द्यावे, अशी सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्याचबरोबर कामगारांच्या पलायनाचे कारणही गडकरी यांनी राज्यांच्या लक्षात आणून दिले आहे.
 
nitin gadkari 26_1 &
 
देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २५ हजारांच्या पलिकडे गेला आहे. मागील दहा दिवसांमध्ये देशातील संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून, दुसरीकडे परराज्यात अडकलेल्या आपल्या कामगारांना परत आणण्यासाठी राज्य सरकारांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने दुसऱ्या राज्यातील कामगारांना परत आणण्यासाठी पाऊले उचलली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असा निर्णय न घेण्याची सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कामगारांच्या स्थलांतराविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “जी राज्य विकसित आहेत, अशा ठिकाणी कमी विकसित असलेल्या राज्यातून लोक रोजगारासाठी येतात. सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर कामगार पायीच घरी जात असल्याच्या घटना यामुळे वाढल्या आहे, कारण हे लोक घाबरून गेले आहेत. त्यांच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करायला हवी. राहण्याची सुरक्षित व्यवस्था झाली, जेवणाची व्यवस्था झाली, तर त्यांची मनातील भीती दूर होईल आणि मानसिकता बदलेल. त्यामुळे ते घरी न जाता आहे, त्याच ठिकाणी थांबतील. कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ही वेळ योग्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडकलेल्या कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. पण, मला वाटत ही गर्दी मुंबईतून जाताना त्यांच्या गावात करोनाचा संसर्ग घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर मोठी अडचण होईल,” अशी भीती गडकरी यांनी व्यक्त केली.