देवा! हा लॉकडाऊन संपू दे रे!

    दिनांक :17-May-2020
|
 
 
lockdown_1  H x
 
 
डॉ. अजय कुळकर्णी
9423403659  
 
‘‘देवा! हा लॉकडाऊन लवकर संपू दे रे! आणि आमच्यावरच हे संकट टळू दे!...’’ अशी देवाला रोज सकाळी चहापूर्वी, दुपारी जेवणानंतर आणि रात्री झोपताना अशी तीन वेळा प्रार्थना करायला लागलो आहोत आम्ही. ही प्रार्थना देशासाठी, जगासाठी नाही तर नवरा या जातीसाठी करीत आहोत! कारण आमच्यावर जे भयंकर संकट आलं ते कुणावरही येऊ नये. जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून आमच्यावर नुसता अत्याचार सुरू आहे हो! स्वयंपाक करा, भांडी घासा, फरशी पुसा, धुणे धुवा... काय काय करावं लागतं आहे या लॉकडाऊनच्या काळात राव!
 
 
हिंदी चित्रपटात बायकोचा सतत अत्याचार सहन करणार्‍या ओमप्रकाशसारखी आमची अवस्था झाली आहे. म्हणूनच आम्ही लॉकडाऊनपासून आमच्या बायकोला भाग्यवान म्हणायला लागलो आहोत. बरं, आता मुलंही आम्हाला भांडेवाला मामा म्हणून हाक मारायला लागले आहेत. काल तर आम्ही गॅलरीत भांडी घासत असताना एका टवाळाने मामा म्हणून आवाज दिला आणि आमचे धाबेच दणाणले. काय झाले रे विचारले, तर आमचे बाबाही हे रोजच करतात म्हणाला. काय अवस्था झालीय राव नवर्‍यांची सगळीकडेच. लोग मुझे क्यू देते है ताना, जमाना तो है नौकर बिवीका!
 
 
घरी फक्त खायला आणि झोपायला येत जा, असे नेहमीच म्हणणारी आमची बायको आता मुद्दाम जाता का बाहेर म्हणून विचारत असते. नाहीतर घरातली कामे उरका, असा फतवा निघतो. पक्का कामवाला केला आमचा या लॉकडाऊनने. भांडी घासताना जर का एखादे भांडे खरकटे राहिले तर ते आमच्या अंगावर फेकले जाते. इतके दिवसात साधे भांडी घासायलाही शिकला नाहीत अजून. ऑफिसमध्ये काय दिवे लावत असाल देवाला माहिती, असा आमचा पाणउतारा रोजचाच. खरंच देवालाच माहिती आहे, आम्ही कोणते दिवे लावतो ते, पण घरी मात्र आमचा दिवा सतत टिमटिमताच असतो अलीकडे. बोलण्याची तर हिंमतच राहिली नाही. पार खचून गेलो आहोत हो आम्ही. राजेश खन्नाने म्हटलेच आहे- सासू तीरथ ससुरा तीरथ, तीरथ साला साली है, दुनिया के सब तीरथ झुटे चारोधाम घरवाली है... तर या चारोधामविषयी जर काही बोललो तर बायको-मुलं सगळेच आमच्या वाक्याला शब्दाच्या तलवारीनेच उत्तर देतात. आमची पार जिरवायची म्हणून त्यांनी आता संघटना स्थापन केली आहे ‘बाशिघचांअते’ नावाची. म्हणजे ‘बाबांना शिकवा घरकाम, चांगले अडकले ते.’ चीनचा या संघटनेवर प्रभाव असावा कदाचित.
 
 
बरं! स्वतः मात्र टीव्ही आणि मोबाईलवर असतात सगळे. जास्त वेळ मोबाईल वापरणे योग्य नाही. असे म्हटले तर स्त्री स्वातंत्र्य आलेच मधे. आम्हाला मोबाईल वापरण्याचे स्वातंत्र्यही नाही का? वगैरे वगैरे. जरा का आम्ही टीव्ही सुरू केला की, बातम्या पहिल्याने लॉकडाऊन संपणार नाही. संपेल तेव्हा येईलच वृत्तपत्रात. मुलांना पाहू द्या टीव्ही. मग काय, बसा मूग गिळून. वर्क फ्रॉम होमचे कारण सांगून कामं टाळण्याचा प्रयत्न केला तर हे नाटक आहे तुमचे. काही काम नाही तुम्हाला ऑफिसचं म्हणून पुन्हा आमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. वैतागलो आता राव!
 
 
कामं झाली की तिच्या सौंदर्याची स्तुती करा. मनात नसतानाही एकापेक्षा एक चित्रपटातील रूपवती गुणवती, प्यारी किती, माझी बायको... हे गाणं म्हणा, तरीही आमची नाही ती नाहीच. बंद करा भसाडा आवाज. गाणे तरी म्हणता येते का नीट? ते तुमचे मित्र पाहा, बायकोला कसं आनंदी ठेवतात. नाहीतर तुम्ही, साधं गाणंही म्हणता येत नाही. भयाडवानाचे. हे सांर नशिबी आलं ते या लॉकडाऊनमुळे. अलीकडे तर दिवसच निघू नये असे वाटायला लागले आहे आम्हाला. दिवस निघाला की घरकाम, स्वयंपाक वगैरे. बरं, जे केलं ते मुकाट्याने खातील तर ती मुलं आणि बायको कसली? कधी भजे करायला शिकविण्याच्या नावाखाली भज्यावर ताव, तर कधी या लॉकडाऊनमधे दोसा शिकून घ्या म्हणत पार अण्णा केला की हो आमचा. बदला घेणे सुरू आहे नुसता. कर्माचे भोग, दुसरे काय! उभ्या आयुष्यात केली नसतील तेवढी कामे केली आम्ही या लॉकडाऊनच्या काळात. काय करणार, होम मिनिस्टरचा आदेश पाळण्याचा आदेश झाला आहे काही दिवसांपूर्वी. आता साहेबच आदेश पाळतात तर आमची काय हिंमत ब्र काढण्याची? लॉकडाऊन संपल्यानंतर तर घरी येणारच नाही आम्ही. जाऊ कुठेतरी हरिद्वारला नाहीतर काशीला, परंतु घरी येणार नाही.
 
 
कामे करून कितीही थकलो, तरी देवासमोर आमची प्रार्थना मात्र नित्यनेमाने सुरू आहे, दिवसातून तीन वेळा- सकाळी चहापूर्वी, दुपारी जेवणानंतर आणि रात्री झोपताना. तुम्हीही करत जा प्रार्थना आमच्यासारखीच...
 
 
••