आभासी वास्तव

    दिनांक :17-May-2020
|
 
akashi _1  H x  
 
 
डॉ. भूषण केळकर
7774048770
 
या फेब्रुवारीमधली हृदयस्पर्शी बातमी!
‘मिटिंग यू’ या नावाच्या एका कार्यक्रमामध्ये कोरियामधील ‘जांग-जी-संग’ नावाच्या एका आईवर आधारित व्हर्च्युअल रिआलिटीचा आविष्कार!
 
 
‘जांग-जी-संग’ ही आई तिच्या ‘नेयॉन’ नावाच्या लहान मुलीच्या मृत्यूमुळे उन्मळून गेली होती आणि तिचं कोमल मातृहृदय शतश: विदीर्ण झालेलं! मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ यांनी तिला मदत करायचा खूप प्रयत्नही केला, परंतु व्यर्थ! मग काही महिने अथक प्रयत्न करून लहानग्या ‘नेयॉन’चे जुने फोटो व व्हिडीयोजचे संकलन करून तिची आभासी प्रतिमा तयार केली गेली, ‘नेयॉन’चा आवाज, तिच्या लकबी, हावभाव हे कम्प्युटरला ‘शिकवले’ गेले आणि मग हुबेहूब नेयॉन आभासी स्वरूपात बनवली गेली!
 
 
मग ‘जांग-जी-संग’ या आईला व्हर्च्युअल रियालिटीचा हेड माउंडेट डिव्हाइस (म्हणजे हेल्मेट) देण्यात आले आणि ती एका खोलीमध्ये खुर्चीवर बसलेली असूनही तिला भासमान झालं की ती तिच्या घराजवळच्या ओळखीच्या उद्यानात आहे आणि तिला दिसलं की, तिची वर्षापूर्वी अकाली निधन झालेली प्रिय मुलगी ‘नेयॉन’ तिच्याकडे हात पसरून धावत येते आहे. ‘नेयॉन’ तिला तिच्या चिरपरिचित आवाजात म्हणते आहे- ‘‘आई, मला तू खूप आवडतेस आणि मी यापुढे छान वागेन, तुला त्रास देणार नाही!’’ डोळ्यांतून (खर्‍याखुर्‍या) अश्रुधारा गालावर ओघळणारी जांग-जी-संग आपल्या मुलीला सांगते की, ‘‘बाळा, तूही मला फार प्रिय आहेस!’’ या आईला आपण एका खोलीत खुर्चीवर बसलोत आणि त्या टीव्ही प्रोग्रामची लोकं, तिची अन्य नातेवाईक मंडळी त्याच खोलीत आहेत आणि तिची ही प्रतिक्रिया बघत आहेत. त्यांचेही डोळे भरून आलेत, याची गंधवार्ताही या आईला नाही, इतकी ती त्या ‘आभासी बागेत’ नेयॉनबरोबर रममाण झाली आहे!
 
 
जांग-जी-संग आता खूप सावरली आहे. आभासी जगात नेयॉनला भेटून तिच्या मनाला उभारी आली आहे आणि ती तिच्या मुलाखतीत सांगते की, ‘‘नेयॉनला भेटणे आभासी असलं, ती खरं तर या जगात नाही हे स्वीकारलं असलं, तरी मला आता हे पटलं आहे की, नेयॉनचं शरीरअस्तित्व नसण्याचं दु:खापेक्षा, माझं तिच्यावरचं प्रेम हे सच्चे आणि खूप अधिक आहे, हे नीट समजल्यामुळे माझं मन शांत झालंय, स्थिर झालंय!’’
 
 
मला खात्री आहे की, वाचकांना ही द. कोरियामधील घटना वाचून मनात अनेक विचार येतील ‘‘आपापल्या परिजनांसंबधी, मित्रपरिवाराविषयी आणि याचे अवतरण आपण केले तर?’’ असा प्रश्नही मनात येईल. अर्थात या अवतरणाचे दुष्परिणामही होऊ शकतील, हेसुद्धा आपण समजू शकतो. उदाहरणार्थ, कोणाला या आभासी जगातच राहण्याचा, दुर्दैवाने गेलेल्या (विशेषत: अकाली) व्यक्तीशी सतत संपर्क ठेवावासा वाटला तर? मृत झालेली व्यक्ती परत वास्तव जगात कधीच दिसणार नाही आणि भेटणार नाही हे पचायला जड असणारं, पण निखळ कटू सत्य स्वीकारता आलं नाही तर?
 
 
तर हेच तंत्रज्ञान दु:खाचं कारण ठरेल, हेही त्रिवार खरं आहे! आणि म्हणजेच कुठल्याही इतर तंत्रज्ञानाप्रमाणेच व्हर्च्युअल रिआलिटी/ऑग्मेंटेंड रिआलिटीचे तंत्रज्ञान हेसुद्धा ‘कोण’ आणि ‘कशासाठी’ वापरतो आहे त्यावरच अवलंबून आहे!
व्हर्च्युअल रिआलिटीचा वापर हा शिक्षण क्षेत्रामध्येसुद्धा होतो आहे आणि वाढता आहे.
 
 
मागील वर्षी कामानिमित्त अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा समजलं की, शालेय विद्यार्थ्यांना हृदयाच्या झडपा कशा काम करतात, हृदयाचे चार कप्पे कसे काम करतात, हे सर्व नीट समजण्याकरिता व्हर्च्युअल रिआलिटीचा वापर करून तुम्ही रक्तप्रवाहाबरोबर ‘वाहत’ जाताय आणि हृदयाच्या एका कप्प्यातून दुसर्‍या आणि पुढे ‘रोहिणी’मधून शरीरात कसे प्रवाहित होतात ते स्वत: अनुभवता!
 
 
सर्व मुला-मुलींचे म्हणणे पडले की, असं शिकल्यामुळे हृदयाचे कप्पे/झडपा याबाबत त्यांना आता काही शंका नाही आणि त्याचा (आभासी का होईना) ‘स्वानुभव’ असल्याने ते जन्मभर लक्षात राहील!
मागील लेखामध्ये आपण अठ/तठ चा वापर मार्केिंटगमध्ये कसा होतो ते बघितलं आणि आपण तो मानसोपचार, शिक्षण यामध्ये कसा होऊ शकतो हे बघितलं. पुढील लेखात आपण विशेषत: ऑग्मेंटंड रिआलिटी व हायब्रिड रिआलिटीचे अविष्कार व उपयोग नीट अभ्यासू.
 
 
‘लॉकडाऊन 4.0’ उद्यापासून सुरू होईल. आत्मनिर्भर भारतासाठी ‘स्वदेशी’ तर लागेलच, पण तंत्रज्ञानस्नेहीसुद्धा बनायला लागेल. हे आपण सर्वच जण ध्यानात ठेवू! म्हणजेच ‘लॉकडाऊन 4.0’ ला ‘इंडस्ट्री 4.0’ ची साथ असणार आहे, बरं का!
 
 
••