...तेथे सुत पहुडला मुक्ताईचा।।

    दिनांक :17-May-2020
|
 

muktai_1  H x W 
 
प्रकाश एदलाबादकर
 9822222115
 
 
एखादी नवमाता आपल्या तान्ह्या बाळाला न्हाऊ-माखू घालते. आपल्या पदराने त्याचे अंग पुसून त्याला अंगडे-टोपडे घालते. काजळ-तीट लावते. दुपट्यात गुंडाळून पाळण्यात टाकते. आंघोळीच्या वेळी ठणाणा रडारड करणारे ते बाळ, पाळण्यात पडल्यावर मात्र हातपाय हलवून, हसून, क्वचित हां-हूं करून दाद देते. तेवढ्यात त्याची आई पाळण्याची दोरी हातात घेऊन हलके हलके अंगाई म्हणते. ते बाळ आपल्या आईकडे एकटक बघत असते. पाळण्याची लयबद्ध आंदोलने आणि आईचे स्वर याचे गारूड त्याच्यावर होऊन बाळ झोपी जाते. अंगाईतून आई काय सांगते -बोलते आहे, हे बाळाला कळत असेल का? त्या शब्दांचे अर्थ आणि आशय त्याला समजले असतील? कुणास ठाऊक! निरागस चेहर्‍याचे ते बाळ शांतपणे झोपी जाते. निर्घोर, निश्चिंत झोप, समाधी लागल्यासारखी. गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या एका कवितेचा उल्लेख या ठिकाणी करायला हवा.
 
गुरुदेव म्हणतात-
 
Baby knows all manners of wise words, though few on earth can understand their meaning. It is not for nothing that he never wants to speak. The one thing he wants is to learn mother's words from mother's lips. That is why he looks so innocent.
 
आईच्या ओठांतून बाहेर आलेला प्रत्येक शब्द ते बाळ ऐकत असते. त्यातूनच बाळाचे जीवन घडत असते. एखाद्या तान्ह्या बाळाला आसपासच्या अनेक महिलांमधून आपली आई नेमकी ओळखता येते. संतांचेही शब्द असेच जीवनाची जडणघडण करणारे असतात. म्हणूनच संतमहात्म्यांचे स्थान आईच्याच बरोबरीचे असते. संत हे ‘माउली’ असतात ते यासाठीच. फार मोठा अधिकार असावा लागतो असे माउलीपण प्राप्त करायला! सकळ संतमंडळाची माता असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाईचा अधिकार याच कोटीतील होता. त्या आधिकारापोटीच तिने चांगदेव वटेश्वराला आपला शिष्यच नव्हे, तर ‘बाळ’ बनवला. ज्वालाग्राही चेतनाशक्ती असलेले चांगदेव सर्वशास्त्रपारंगत आणि योगिश्वर होते. परंतु, त्यांचा अभ्यास हा अहंकाराने लिप्त आणि ज्ञान हे सत्संगविरहित झालेले होते. हे मुक्ताईने जाणले. आपल्या बाळाला म्हणजे चांगदेवाला निजवण्यासाठी तिने पाळणा लिहिला आहे. पाळणा हे अध्यात्मात जन्म-मरणाच्या वारंवारितेच्या आंदोलनांचे प्रतीक, तर प्रपंचात सृजनाचा उत्सव. पाळण्याला कोणीही हात लावा, कुणीही हलवा, परंतु पाळण्याला आईचा हात लागल्याशिवाय बाळ झोपत नाही. पुढील आयुष्यात येणार्‍या आंदोलनांची जाणीव हा पाळणा करून देत असेल का? मुक्ताईने चांगदेवाला पाळणा गायिलेला आहे-
 
 
निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला।
तेथे सुत पहुडला मुक्ताईचा।।
निज निज बाळा करी न पै आळी।
अनुहात टाळी वाजविते।।
तेथे निद्रा न जागृती। भोगी पै उन्मनी।।
लक्ष तो भेदूनि। निजला तो।।
निभ्रांत पाळी पाळणा विणवूनि।
मन हे बांधोनि पवनदोरा।।
एकवीस सहस्र सहाशे वेळा बाळा।
तोही डोळा स्थिर करी।।
निद्रा ना जागृती निजसी बा काही।
परियेसी चांगया बोले मुक्ताई।।
 
 
या पाळण्याच्या निमित्ताने मुक्ताईने या ब्रह्माण्डाच्या मुळाचा शोध घेतलेला आहे. आपल्या चांगया बाळाला निजावयाला तिने पाळणा टांगलेला आहे तो काही सर्वसामान्य खुंटीला नाही. या विशाल जीवनवृक्षाला कितीतरी फांद्या आहेत. कोणत्याही फांदीला पाळणा टांगला असता, तर काय फरक पडला असता? परंतु, ती मुक्ताई आहे. आदिशक्तीचे रूप आहे. ब्रह्मचीत्कला आहे. हे सारे जगच तिचे लेकरू आहे. या लेकरांचे तिला उन्नयन करायचे आहे. तेही अध्यात्माच्या पातळीवर. पाळण्याच्या रूपकातून तिने याच उन्मनी अवस्थेचे वर्णन केले आहे. यासाठी तिने बाळाचा पाळणा निर्गुणावस्थेच्या डहाळीला टांगला आहे. बाळाला सांगतेय्‌- रडू नको, चुळबुळ करू नको. प्रपंचाच्या आणि जगरहाटीच्या अडथळ्यांना दूर सारायला साधनेचा मार्ग स्वीकार.
 
 
बाळाला लवकर झोप लागावी म्हणून आई खुळखुळा किंवा टाळ्या वाजवते. मुक्ताई मात्र आपल्या बाळासाठी अनाहताच्या नादाची टाळी वाजवते आहे. हा अनाहताचा नाद ऐकायला आला की, निद्रा आणि जागेपणा याच्याही पलीकडे साधक जातो. आत्मस्वरूपाची ओळख होते. आश्चर्य याचे वाटते की, त्या काळी मुक्ताईसारखी चौदा वर्षांची पोर चौदाशे वर्षांच्या चांगदेवाला अध्यात्मदर्शनाचा पाठ कसा देते? प्रश्नाचे उत्तर आपल्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीला मिळत नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर शोधायलाही थोडा का होईना, अधिकार असावा लागतो. आणि जिथे उत्तर मिळण्याचा आपला अधिकार नसतो तिथे, आपोआप श्रद्धेने आपले हात जोडले जातात, आपण नतमस्तक होतो. तिने नुसता पाळणाच नाही लिहिला, आई होऊन तळमळीने उपदेश केला. प्रपंचाचा कुठलाही अनुभव नसलेली मुक्ताई अशी आई झाली. मातृभाव हा कोणत्याही वयातल्या स्त्रीचा स्थायीभाव असतो. तो ओळखता आला पाहिजे. चांगदेवाला एका ठिकाणी ती म्हणते- 
 
मुक्त होतासी तो का बद्ध झालासी।
आपल्या बंधने आपण बंधालासी।
सांडी बंधन सोय धरी गव्हारा।
जाई मूळस्थाना आपुल्या माहेरा।।
 
 
मुळात मुक्त असलेले आपले आत्मस्वरूप तूच बंधनात टाकलेले आहेस. क्रोध, अहंकारादी विकारांनी तूच त्याला बांधून ठेवलेस. ही सर्व बंधने तोड. अंतर्मुख हो. आत्मस्वरूपाची ओळख होईल,अशीच सोय धर म्हणजे त्या मार्गावरून जा.
 
 
चर्मचक्षूने न लक्षी। ज्ञानदृष्टीने परीक्षी।
सहजासहजी लाभ झाला।
मोल घेया कोण उरला।।
 
 
वरवरचे बघू नकोस, तर अंतर्दृष्टीने हे जग पारखून घे. असा रोकडा उपदेश करून त्याला दृष्टी दिली. ‘आनंदाचे लेणे मुक्ताई ल्याली। पालवू लागली चांगयासी।।’ म्हणूनच मुक्ताई ही सर्व संतमंडळाची आई झाली, माउली झाली. योगशास्त्रात कर्मठता असते. योगाला नामाची संगती लाभली तर योगी हा भक्त होतो आणि असा भक्त की, समाजापासून आणि देवापासून कधीच विभक्त होत नाही. लोककल्याणाचा मार्ग हाच त्याचा जीवनमार्ग ठरतो. चांगदेवाच्या निमित्ताने मुक्ताई अशी आपलीही आई झाली आहे. आपल्या बालपणी आपल्याला हातांवर आंदुळताना आणि आपल्या पाळण्याला झोके देताना आपलीही आई हेच म्हणाली असेल ना? अभिव्यक्त होण्याची तिची भाषा कदाचित वेगळी असेल, परंतु भाव नक्की तोच होता.
 
ज्ञानदेवांच्या झोळीत समाजकंटकांनी शेणमाती कालवली, त्या वेळी तो शांतिब्रह्मदेखील संतापून गेला होता. त्या वेळी मुक्ताईनेच त्याला समजावले. आईच्या मायेने ज्ञानोबांची समजूत घातली. ताटीचे अभंग हे केवळ निमित्त आहे, या अभंगात मुक्ताईने जगण्याचे सर्व सारतत्त्वच मांडले आहे. आईची माया आणि विलक्षण आत्मविश्वास यांचा संगम म्हणजे ताटीचे अभंग.
 
 
योगी पावन मनाचा।
साही अपराध जनाचा।।
विश्व रागे झाले वन्ही।
संती सुखे व्हावे पाणी।।
शब्द शस्त्रे झाले क्लेश।
संती मानावा उपदेश।।
विश्व पट ब्रह्म दोरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
 
 
ही त्या मुक्तामातेची हाक होती, आईच्या मायेने ओथंबलेली. आईच्या मनातला हा भाव ओळखायला आपले अर्ध्याच्या वर आयुष्य जावे लागते, हीच खरी आपली शोकांतिका आहे, असे नाही जाणवत? समाजातील प्रत्येक व्यक्तीला मुक्ताई आदिशक्ती वाटू लागल्या. मुक्ताईच्या आयुष्याचा उत्तरार्ध खान्देशात तापीतीरावर व्यतीत झाला. मुक्ताई खान्देशात घराघरांत जाऊन पोचल्या. मुक्ताई ही खान्देशातील स्त्री गीतांचे अविभाज्य अंग झाल्या. सर्व प्रकारच्या पूजांमध्ये मानसपूजा ही संतांनी सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. आपण मनानेच सर्व पूजा करतो. पूजेचे सर्व उपचार करणारे मनच आहे. मनाने, मनासाठी, मनापासून केलेली पूजा म्हणजे मानसपूजा! अशा या पूजेतील सर्व उपकरणे आणि उपचार म्हणजे आपले मनच असते.
 
 
आपण रोजची पूजा सर्वोपचारासहित करतो. त्यासाठी निरनिराळी उपकरणे वापरतो. अलंकृत पूजाही करतो. परंतु या पूजेत मनच नसेल, तर त्याचा काय उपयोग? पूजा ही झगमटावर आणि उपकरणांवर अवलंबून नाही आणि नसावी. तुमचे सत्त्व त्या पूजेत किती आहे, तुम्ही मनाने किती समर्पित आहात हे महत्त्वाचे. ‘क्रियासिद्धी सत्त्वे भवती महतां नोपकरणे’ असे शास्त्रवचन आहे. मानसपूजेत महत्त्वाची आहे ती नामसाधना. संतांना देवाचे दर्शन झाले ते मानसपूजेतूनच. मुक्तााईनेही हा मानसपूजेचा भाव आपल्या अभंगातून नेमकेपणाने मांडलेला आहे.
 
 
पूजा पूज्य वित्ते पूजक पै चित्ते।
घाली दंडवत भावशील।।
चंपक सुमने पूजी कातलीने।
धूप दीप मने मानसिक।।
भावातीत भाव वोगरी अरावो।
पाहुणा पंढरीरावो हरि माझा।।
मुक्ताई संपन्न विस्तारुनि अन्न।
सेवी नारायण हरि माझा।।
 
 
‘हरि माझा’ या दोन वेळा आलेल्या शब्दांमध्येच सर्वकाही आले. मुक्ताई पांडुरंगाला अन्न वाढते आहे. कसले हे अन्न? हे भक्तिभावाचे अन्न! तेही विस्तारूनि म्हणजे, मनातील भक्तिभाव त्याच्या पायी उधळून दिला आहे. मुक्ताई श्रीमंत आहे, संपन्न आहे, कारण अशा भक्तीच्या राशीच्या राशी तिच्या मनात साचून आहेत. मुक्ताईने सद्गुरूंचीही अशीच मानसपूजा केली आहे.
 
 
धन्य धन्य सद्गुरुराव।
माझ्या देही दाविला देव।।
माझ्या देहाचे देऊळ केले।
आत्मलिंग प्रतिष्ठिले।।
सत्रावीचे जळ आणी।
तेणे देवा अखंड न्हाणी।।
त्रिगुणाच्या वळल्या वाती।
साक्षी तुर्या लावी ज्योती।।
पंचप्राण पंचारती।
मुक्ता गुरूला ओवाळिती।।
 
या अभंगात मुक्ताईने साक्षात सर्व योग उभा केलेला आहे. गुरुपूजनाची समाधी लागलेली आहे. देहभान नाहीच. अख्खा देह देऊळ झालेले आहे. सद्गुरूने देह हा पवित्र आणि शुद्ध केला आणि त्यात देव मांडला. कोणता? तर आत्मिंलग प्रतिष्ठिले. आत्मजाणीव जागृत केली. आत्मभान दिले. मीच परमेश्वराचा अंश आहे, ही स्वात्मजाणीव दिली. मुक्ताईच एका ताटीच्या अभंगात म्हणते, ‘आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे!’ समाधी अवस्थेतील सत्रावी कळा जागृत झाली आणि त्या जळाने आत्मलिंगाला अभिषेक केला. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या वाती करून मनाची ज्योत प्रज्वलित केली. पाचही प्राणांची पंचारती ही मानसपूजेतील सर्वोच्च अवस्था. हे सारे मुक्ताईने साधले. म्हणूनच ती योगिनी होती. ज्ञानोबा आणि सोपानदेव वैकुंठाला निघून गेलेले होते. संत निवृत्तिनाथ आणि माय मुक्ताई यांची भेट झाल्याचा आणि त्यांचा संवाद झाल्याचा उल्लेख संत नामदेव महाराजांनी ‘समाधी प्रकरणा’त केला आहे.
 
 
त्या वेळी ते दोघे बहीण-भाऊ काय बोलले असतील? बहीण-भाऊ म्हणून बोलले असतील की, नाथपंथातील सिद्ध म्हणून बोलले असतील? त्यांच्यातील एकान्त संवादाचा उल्लेख संत नामदेवांनी केलेला नाही. निवृत्तिनाथांनी तिला विचारले, ‘‘वैकुंठगमन केव्हा करणार?’’ ती म्हणाली, ‘‘कोठे जाणे आणि कोठे येणे? सर्व एकस्वरूपच आहे. जाणे काय आणि येणे काय, आपल्यासाठी सारखेच.’’ परमार्थाच्या वाटा सामान्य प्रापंचिकांसाठी मुक्ताईने सोप्या भाषेत निवेदिल्या. स्त्रियांच्या आदिम दुःखाला वाचा फोडली. प्रपंच आणि व्यवहार यांच्या भाषेतून अध्यात्म मांडले. लोककल्याणाचे व्रत अंगीकारलेली ही योगिनी जगाची आई झाली. ही आई परमेश्वराशी तदाकार झाली तो आजचाच दिवस. वैशाख महिन्याच्या वद्य पक्षातील दशमी. वैशाख वद्य दशमी म्हणजे उन्हाचा उच्चांक. त्यातही खान्देशातील वैशाख वणवा. तापीतीर पूर्ण तापलेला. आधीच तापीमाय सूर्यकन्या आणि जीवघेणा उन्हाळा. एकाएकी झंझावात सुटला. आकाश ढगांनी भरून गेले. वीज कडाडली. आवेगाने आलेल्या विद्युल्लतेने मुक्ताईला मिठी मारली. मुक्ताई त्या विजेच्या लोळात अंतर्धान पावली. संत नामदेव लिहितात-
 
 
कडाडली वीज निरंजनी जेव्हा।
मुन्ताई तेव्हा गुप्त झाली।।
वैकुंठी लक्षघन्टा वाजती एक घाई।
झाली मुक्ताबाई स्वरूपाकार।।
नामा म्हणे देवा कैचे आता काही।
आम्हा मुक्ताई बोलली नाही।।