रिलिजन, कन्व्हर्शन आणि मुसलमान

    दिनांक :19-May-2020
|
 

rss _1  H x W:  
 
 
सुनील आंबेकर  
 
 
भारताची परंपरा सांगते- सत्य एक आहे, परंतु शहाणे लोक अनेक नावांनी त्याचे वर्णन करतात- एकं सत्‌ विप्रा: बहुधा वदन्ति। त्यामुळे उपासना किंवा पूजा पद्धती भिन्न आहे म्हणून कुणाशीही दुजाभाव होणार नाही. संघ आणि हिंदू महासभा यांच्यातील हा गंभीर फरक आहे. 1905 साली ब्रिटिश राजवटीत, हिंदूंना राजकारणात एक सशक्त मंच प्रदान करण्यासाठी स्थापन झालेल्या हिंदू महासभेच्या मते, रिलिजनच्या आधारावर लोकांना प्रतिनिधित्व मिळायला हवे. उलट, संघाने अशाप्रकारची मागणी कधीही कुठल्याही स्तरावर केलेली नाही. इथे जन्मलेल्या आणि इथेच राहात असलेल्या सर्वांचा भारत आहे, मग त्यांचा रिलिजन, विचारधारा अथवा दर्शन कुठलेही असले तरी! ही भूमिका संघाने नेहमीच मांडली आहे.
 
 
भारताच्या फाळणीनंतर संघाचे द्वितीय सरसंघचालक गुरुजींनी, फाळणीच्या पीडितांना त्यांचा रिलिजन न बघता मदत करण्याचे स्वयंसेवकांना सांगितले होते. हे भयानक संकट सर्वांवर आले आहे आणि संघ त्यात दुजाभाव करणार नाही, असे ते म्हणाले होते. स्वयंसेवकांनीदेखील अथक परिश्रम करीत सर्वांनाच मदत केली. फाळणीच्या काळातील संघाच्या मदतकार्याची नोंद, अगदी गांधीजींपासून सर्व कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती.
 
 
24 जानेवारी 1948 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठात दीक्षान्त समारंभात भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे भाषण झाले, ते समान सांस्कृतिक वारशाच्या अस्तित्वाला पुराव्यानिशी पुष्टी करणारे होते. या भाषणात काही साधार प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले- ‘‘...भारताला वैचारिक व सांस्कृतिकदृष्ट्या सर्वोच्च स्थान मिळवून देणार्‍या आमच्या पूर्वजांचा तसेच आमच्या वारशाचा मला अभिमान आहे. भूतकाळाविषयी आम्हाला काय वाटते? जसे मला वाटते तसेच, तुम्हालाही यात आपला वाटा असल्याचे, याचे वारसदार असल्याचे आणि म्हणून आपल्या काहीतरी गोष्टींचा अभिमान वाटतो का?’’ ते पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही मुस्लिम आहात आणि मी हिंदू. आमच्या वेगवेगळ्या रिलिजिअस श्रद्धा असतील अथवा काहीच नसतील, परंतु त्यामुळे जो तुमचा आणि माझा सांस्कृतिक वारसा आहे तो कुणी आमच्यापासून हिरावू शकत नाही. आमचा भूतकाळ आम्हाला एकत्र बांधून ठेवतो; मग वर्तमान आणि भविष्य काळ आमच्यात का म्हणून फूट पाडेल?’’
 
 
देशाच्या फाळणीच्या काळात जो काही प्रचंड हिंसाचार झाला, त्याचे रिलिजन हेच कारण होते, हे मान्यच करावे लागेल. रिलिजनच्या आधारावर फाळणीला संघाचा विरोध होता आणि म्हणून जेव्हा फाळणीला गांधीजी तयार झालेत तेव्हा संघ नाउमेद झाला आणि त्याने या निर्णयाचा निषेध केला. नंतर काही व्यक्तींनी गांधीजींचा खून केला, तेव्हा संघविरोधकांना ही दु:खद घटनाही संघावर आळ आणण्याची संधी वाटली. परंतु, तपास आणि चौकशीमधून नंतर हा आळ फेटाळण्यात आला. वस्तुत: गांधीजींनी विविध प्रसंगी संघकार्याची स्तुती केली होती. 16 सप्टेंबर 1947 रोजी, गांधीजींनी वाल्मीकि (तथाकथित खालच्या जातीच्या) वस्तीतील एका शाखेला भेट दिली होती. शाखेत 500 हून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. त्यांनी संघाची जशी 1934 मध्ये केली होती तशी त्याच्या कामाबद्दल प्रशंसा केली. याची बातमी 17 सप्टेंबर 1947 च्या ‘द हिंदू’ वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे.
 
 
सरदार पटेलांनीदेखील संघाबाबतचे नकारात्मक मत खोडून काढले होते. लखनौच्या ऑल इंडिया रेडिओवरील 6 जानेवारी 1948 च्या भाषणात त्यांनी स्वयंसेवकांचा उल्लेख केला, ‘‘ते देशभक्त आहेत आणि ते त्यांच्या मातृभूमीवर प्रेम करतात.’’ गांधीजींच्या खुनानंतर 27 फेब्रुवारी 1948 रोजी पंडित नेहरूंना लिहिलेल्या पत्रात ते लिहितात- ‘‘सर्व आरोपींची तपासणी व चौकशी केल्यानंतर, गांधींच्या खुनात संघाचा कुठलाही हात नाही हे स्पष्ट झाले आहे.’’ असे असतानाही, पंडित नेहरू, राजकीय कारणांसाठी असेल, पक्षपाती होते आणि स्वयंसेवकांनी देशव्यापी सत्याग्रह केल्यानंतरच 12 जुलै 1949 ला संघावरील बंदी उठविण्यात आली.
 
 
संघ विचारक व भारतीय जनसंघाचे (भारतीय जनता पार्टीचे पूर्वरूप) सह-संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांना एकदा, भारतातील मुसलमानांच्या भवितव्याबाबत विचारले. प्रश्न विचारणार्‍याचे म्हणणे होते की, संघ हिंदूंना एकत्रित करण्यात गुंतला आहे, त्याने मुसलमान कमजोर होतील. त्यांनी उत्तर दिले की, भारतातील हिंदू त्यांच्या सहअस्तित्वाच्या मूल्यासाठी ओळखले जात असल्यामुळे मुस्लिमांना कुठलीही हानी होणार नाही. त्यांनी भीतिमुक्त राहायला हवे.
 
 
भारताची फाळणी मुख्यत: मुस्लिम लीगला त्यांचा स्वत:चा देश हवा होता म्हणून झाली. भारतात राहणारे मुसलमान जगात इतर कुठल्याही देशापेक्षा चांगले आहेत, त्यांना जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक लोकशाही स्वातंत्र्य आणि प्रातिनिधिक हक्क आहेत. भारतात इस्लामचे विविध पंथ आहेत आणि ते कुठल्याही भीतीशिवाय आपापल्या श्रद्धेचे पालन करीत असतात, जे अगदी इस्लामी देशांमध्येही शक्य नाही.
 
 
देशाच्या काही भागात, विशेषत: जनजातीबहुल भागात सुरू असलेले रिलिजिअस कन्व्हर्शन्स आणि फुटीरतावादी चळवळींमुळे, भारताची मूल्ये, संकल्पना आणि तत्त्वे यांना मुळापासून धोका निर्माण झाला आहे. प्रारंभी या अशा मुद्यांप्रती कॉंग्रेस पक्ष संवेदनशील होता, परंतु नंतर हळूहळू या मुद्यांपासून त्या पक्षात स्पष्ट दुरावा आणि दुर्लक्ष निर्माण झाले. उदाहरणार्थ- धन, बळजबरी आणि फसवणुकीच्या माध्यमातून हिंदूंचे ख्रिश्चनांमध्ये मिशिनरीज करीत असलेल्या रिलिजिअस कन्व्हर्शन्समुळे उत्पन्न धोक्याकडे लक्ष वेधून त्यावर तोडगा काढण्यासाठी, मध्यप्रदेशच्या कॉंग्रेस सरकारने 1956 साली या ख्रिश्चन मिशनरीजच्या कारवायांचा अभ्यास करण्यासाठी एक नियोगी समिती स्थापन केली होती. परंतु, या समितीच्या शिफारशींची त्या सरकारने अंमलबजावणी केली नाही.
 
 
यासारखेच ख्रिश्चन मिशनरीजच्या कन्व्हर्शनचे कारनामे आणि फुटीरतावाद्यांच्या कारवायांचे एक उदाहरण, ईशान्य भारतात उद्भवले होते. तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री इंदिरा गांधी यांनी रामकृष्ण मठाचे स्वामी रंगनाथानंद यांना एक पत्र लिहिले. 21 जुलै 1965 रोजी लिहिलेल्या या पत्रात इंदिरा गांधींनी रामकृष्ण मठाने जनजातीय लोकांसाठी या भागात शाळा उघडाव्यात म्हणून विनंती केली होती. ख्रिश्चन मिशनरीज या जनजातीय क्षेत्रात शिक्षण संस्था आणि आरोग्य केंद्र चालवून नंतर त्यांचा उपयोग कन्व्हर्शनसाठी करीत असत, म्हणून ही विनंती केली होती. पंतप्रधान म्हणूनही इंदिरा गांधींनी, तामिळनाडूतील मीनाक्षीपुरम्‌ येथे हिंदू मुस्लिम होण्याच्या संख्येत जी अचानक वाढ आली होती, त्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती.
 
 
त्यानंतर आलेल्या सर्व सरकारांनी जे मौनपणे स्वीकारले होते, ते संघाने उच्चरवाने सांगितले. कन्व्हर्शन हा, विशेषत: जनजातीय आणि अविकसित भागात, धोका आहे. संघाने या क्षेत्रात आपला प्रभाव वाढविला आहे. यावर संघाने अतिशय प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे. छत्तीसगडच्या जशपूर येथे मुख्यालय असलेल्या आणि जनजातीय लोकांसाठी समर्पित वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक कल्याणकारी संघटनेच्या मार्फत संघ विविध प्रकारचे अनेक कार्यक्रम राबवीत असतो.
 
 
भारताला महान बनविणे 
संघ काही राजकीय पक्ष नाही, तो सामाजिक संघटन आहे. त्याला कुठलीच राजकीय आकांक्षा नाही, ना तो कुठल्याही राजकीय परिणामांसाठी कार्य करतो. परंतु, त्याचा अखिल भारताच्या राजकीय क्षेत्रावर राजकीय प्रभाव आहे. तो जरी राजकारणापासून अलिप्त राहात असला तरी, त्याच्या शाखेतून तयार झालेले स्वयंसेवक आता राजकारणात आहेत आणि त्यांनी या क्षेत्रात उच्च स्थानही प्राप्त केले आहे. या प्रासंगिक गोष्टी आहेत. संघाचे साधारण तत्त्व हे आहे की, रा. स्व. संघ शाखा चालविण्याशिवाय काहीएक करणार नाही, परंतु स्वयंसेवक मात्र समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्य करू शकतात. स्वयंसेवक समाजाच्या सर्व क्षेत्रात कार्य करीत आहेत- शिक्षण, राजकारण, आर्थिक, सुरक्षा आणि संस्कृती.
 
 
संघाचे एकमेव ध्येय म्हणजे भारताला महान बनविणे हे आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्यासाठी तो समर्पित आहे. सर्व जातींना संघटित करणे आणि एक सशक्त हिंदू समाज निर्माण करण्यासाठी संघ कार्य करीत आहे. काही लोकांना शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि आरोग्य सेवेसाठी पाश्चात्त्य प्रतिमानाची (मॉडेलची) यांत्रिक नक्कल हवी आहे. परंतु, संघाला मात्र, या भूमीतील संकल्पनांवर आधारित नवी व्यवस्था निर्माण करायची आहे.
 
 
नवे तंत्रज्ञान, विशेषत: नाभिकीय (न्युक्लीअर) अस्त्रे आणि उपग्रह दळणवळणाबाबत संघनेतृत्व नेहमीच जागृत आणि भान ठेवून आहे. इतर देशांवरील अवलंबित्व कमी होेण्यासाठी देशीय तंत्रज्ञान विकसित व्हावे यावर त्याचा नेहमीच जोर राहिला आहे. जगात इतरत्र विकसित झालेल्या तंत्रज्ञानाला आपल्या देशातील परिस्थितिनुरूप बदलविले पाहिजे, असे संघाला वाटते. तंत्रज्ञान स्वीकारताना नेहमीच दोन गोष्टी मनात ठेवल्या पाहिजे. एक, तंत्रज्ञानाने कधीही मनुष्याची जागा घेऊ नये. कारण, जरी ते मनुष्यापेक्षा वेगवान असले तरी ते मनुष्याचा पर्याय होऊ शकत नाही. यंत्रांसाठी जेव्हा केव्हा मनुष्याचे हित दुर्लक्षित झाले, त्याचे परिणाम विपरीत आणि अनिष्ट झाले आहेत. याचेच एक स्पष्ट उदाहरण म्हणजे तंत्रज्ञानाला स्वीकारल्यामुळे पर्यावरणाचे झालेले प्रदूषण. पर्यावरणपूरक आणि त्यातही भारतीय मूळ असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे, म्हणून संघ आग्रही असतो.
 
 
रा. स्व. संघाच्या मते, सामाजिक बदल ही वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि हा बदल, समाज व त्याच्या आसपासचे वातावरण यासाठी किती प्रमाणात सिद्ध आहे याच्या वस्तुनिष्ठ आकलनावर आधारित असला पाहिजे. तसे झाले तरच बदल स्थायी होतो. म्हणून, संघ उत्स्फूर्त आणि आकस्मिक क्रांतीवर विश्वास ठेवत नाही. त्याचे कार्य नियोजनबद्ध असते; अनुभव, निष्ठा आणि व्यावहारिक कल्पनाशक्तीने संचालित असते.
 
 
सारांशाने सांगायचे झाल्यास, भारताची अनादी विचारधारा म्हणजे रा. स्व. संघाचे तत्त्वज्ञान आहे. ते पुढील ओळींवर आधारित आहे :
 
 
ॐ सर्वे भवन्तु सुखिन:।
सर्वे सन्तु निरामय:।
सर्वे भद्राणि पश्चन्तु।
मा कश्चिद्-दु:ख-भाग्‌-भवेत्‌।।
ॐ शांति: शांति: शांति:।।
 
 
(ॐ, सर्व जण आनंदी होवोत, सर्व जण निरामय होवोत, जे शुभ आहे ते सर्वांनी बघावे, कुणालाही कुठलेही दु:ख भोगावे लागू नये. सर्वांचे त्रिविध ताप शांत व्हावेत.)
 
 
शाखा व्यवस्था व रचना
डॉक्टरजींनी विजयादशमीच्या दिवशी 1925 साली सप्टेंबर महिन्यात संघ सुरू केला, तेव्हा त्यांनी कुठलीही टाळ्याघेऊ भाषणे दिली नाहीत, ना त्यांची ही घोषणा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. त्यांनी कुठलाही आराखडा अथवा कार्यक्रम समोर ठेवला नाही. डॉक्टरजींनी कागदपत्रांना नाही, तर संघटना बांधण्यास प्राधान्य दिले म्हणून संघाची लिखित घटना नाही. एक धोरण म्हणून प्रसिद्धीला कटाक्षाने दूर ठेवण्यात आले. डॉक्टरजींनी स्वत:च्या अतिशय खडतर जीवनातून घडविल्या गेलेल्या असाधारण आत्मविश्वासाने, 25 किशोरवयीन स्वयंसेवकांच्या मदतीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली.
 
 
संघाचे पहिले हंगामी सचिव- रघुनाथराव बण्डे यांनी संघाच्या बैठकींची माहिती, तसेच त्याच्या स्थापनेचे व नामकरणाचे इतिवृत्त अतिशय व्यवस्थित लिहून ठेवले आहे. घटना आणि नामकरणानंतर, संघाची पहिली बैठक 9 मार्च 1926 रोजी डॉक्टरजींच्या घरी झाली. त्यात काही प्राथमिक गोष्टी ठरविण्यात आल्या- दर पंधरा दिवसांनी एकत्र यायचे आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामशाळा स्थापन करायच्या. स्वयंसेवकांचा गणवेष आणि संघाच्या उत्सवांपैकी वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शिवजयंती उत्सवासाठी वाहनांच्या व्यवस्थेबाबत चर्चा झाली. 21 जून 1926 रोजीची बैठक अनाथ विद्यार्थी गृहात, संघाच्या कार्यपद्धतीवर विचार करण्यासाठी झाली.
 
 
12 डिसेंबर 1926 ची अत्यंत महत्त्वाची बैठक, स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण देण्याबाबत झाली. दर रविवारी सकाळी सहा वाजता हा दिवस व वेळ निश्चित झाला. साधारणत: या काळात संघाची रचना विकसित होत गेली. 19 डिसेंबर 1926 च्या बैठकीत ठरविण्यात आले की, निर्णय-सुलभता आणि शिस्तीसाठी, एक व्यक्ती संदर्भिंबदू म्हणून असली पाहिजे. त्या व्यक्तीला ‘अधिकारी’ असे नाव देण्यात आले. सर्वानुमते हे स्थान डॉक्टरजींना देण्याचे ठरविण्यात आले. डॉक्टरजींनी सरसंघचालक पदाचा भार 10 नोव्हेंबर 1929 ला स्वीकारला. ‘िंहदू ओळख हीच आमची राष्ट्रीय ओळख’ हा डॉक्टरजींच्या दृष्टीने राष्ट्रीयतेचा मूलतत्त्वविचार होता. ही ओळख पुनर्स्थापित करण्यासाठी रा. स्व. संघाची स्थापना करण्यात आली.
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी अखिल भारतीय संघटन मंत्री व रा. स्व. संघाचे विद्यमान अखिल भारतीय सह प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी लिहिलेल्या ‘द आरएसएस रोडमॅप्स फॉर द ट्‌वेन्टीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाचा क्रमश: भावानुवाद
 
••