लॉकडाऊनमधला कौटुंबिक हिंसाचार...

    दिनांक :21-May-2020
|
माधुरी साकुळकर
 
लॉकडाऊनचे जसे काही चांगले परिणाम झाले तसे काही वाईट परिणामसुद्धा झालेत. हवा, पाणी, निसर्ग, नद्या, पर्यावरण प्रदूषणमुक्त झाले. मोर रस्त्यावर नाचायला लागले. हत्ती, हरीण मुक्तपणे बागडायला लागले. घराचं, घरातल्या माणसांचं, नातेवाईकांचं महत्त्व कळलं. घरातला संवाद वाढला. आतुरतेनं रविवारची वाट पाहणार्‍यांसाठी, टारगेट, डेडलाइन्स या चक्रात सापडलेल्यांना प्रत्येकच दिवस रविवार वाटायला लागला.
 
 
पण, त्याच वेळेस अनामिक भीतीही वाटू लागली. आपल्याला कोरोनाची लागण तर होणार नाही ना.. या महिन्यात अर्धा पगार झाला, पुढच्या महिन्यात झालाच नाही तर..., नोकरी गेली तर..., बाजारात वस्तू मिळाल्या नाहीत तर... एक ना अनेक चिंता! घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे, घरातल्या माणसांचं अपरिहार्यपणे तोंड पाहणं, चिंता, वैफल्य यामुळे होणारी चिडचिड, मनस्ताप समोरच्या व्यक्तीवर निघणं... सगळंच अधांतरी, भविष्याची चिंता या सर्वांचा राग कुठेतरी घरच्या हक्काच्या माणसांवर निघणं, यातून कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण जगभर वाढलेले आहे. महिला बालकल्याण विभागाकडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी वाढलेल्या आहेत.
 

Lock Down_1  H
 
 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्याकडे मार्चपासून एप्रिलपर्यंत तक्रारी आल्या, यात कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी होत्या. या झाल्या तक्रार केलेल्या; पण तक्रार दाखल न केलेल्या (लोकलज्जेमुळे, ज्याच्याविरुद्ध तक्रार करायची ती व्यक्ती घरीच असल्यामुळे, घराबाहेर पडता न आल्यामुळे) अशा कितीतरी तक्रारी असतील. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी 10 एप्रिलला एक व्हाट्स ॲप नंबर लॉन्च केला, त्यावर तक्रार करता येईल.
 
 
अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात तसंच होतंय. 24 तास तेच ते चेहरे पाहायचे. स्त्री सतत कामात, धुणी-भांडी, झाडझुड, स्वयंपाक यात गुंतलेली. सगळ्याच कामवाल्या सुट्टीवर आणि हिला इतक्या कामांची सवय नाही. मुलांचा अभ्यास, त्यांचा सतत धिंगाणा आणि काहीतरी नवीन खायला दे असा आग्रह, त्यामुळे ही सतत स्वयंपाकघरात. भारतीय पुरुषांना घरकामाची सवय नाही (सन्माननीय अपवाद वगळता), त्यामुळे त्यांचे टीव्ही पाहणे, मोबाईलवर गेम खेळणार्‍या आणि हे कर, ते कर अशा फर्माइशी करणार्‍या पुरुषांचा तोटा नाही. कधीकधी तर दोष दोघांचाही नसतो, तर तो परिस्थितीचा असतो. बरं. त्याला मदत करायची नसते असंही नाही, पण त्याला सुचत नाही आणि ही सांगत नाही. सवय नसल्यामुळे त्याला वेळ लागतो आणि हिच्या मनाप्रमाणे काम होत नाही, त्यामुळे त्याला सांगण्यापेक्षा हीच ते काम करून मोकळी होते.
 
 
चरस, गर्द, दारू, सिगारेट इत्यादी व्यसनसामग्री न मिळाल्यामुळे त्याची चिडचिड होते. withdrawal symptoms दिसतात. घरात बांधल्या गेल्यामुळे अजूनच निराशेत भर पडते. चौकापर्यंत सहज फिरायला जाण्यात, टपरीवर उभं राहण्यात, पानठेल्यावर उभं राहून अख्ख्या जगाचा इतिहास-भूगोल जाणून घेण्यात पुरुषांचा बराचसा वेळ जातो. हे सगळंच आता बंद आहे.
 
 
माझी एक स्नेही म्हणाली, आठ तास ऑफिस, आठ तास झोप, चार तास घरकाम, म्हणजे फक्त चार तास नवर्‍याला सांभाळावं लागतं म्हणून बरं. 24 तास मी त्याच्याबरोबर राहूच शकत नाही. कधीकधी एखादी व्यक्ती इतकी तापट, अधिकार गाजवणारी असते की तिच्या नुसत्या असण्याने दडपण येतं. कधी ती व्यक्ती बाहेर जाते याची वाट घरातील सर्व व्यक्ती पाहात असतात. स्वतःच्या तालावर सगळ्या घराला नाचवणार्‍या व्यक्तीपण असतात.
 
 
आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचार आहेच; म्हणूनच 2005 साली कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा आला. त्याची यंत्रणा उभी करायला वेळ लागला. प्रोटेक्शन ऑफिसरच्या नेमणुका आणि त्यांचे ट्रेनिंग होऊन आता ते व्यवस्थित कामाला लागले आहेत. फर्स्ट क्लास जुडिशियल मॅजिस्ट्रेटपुढे अशा केसेसची सुनावणी होते. त्यासाठी स्वतंत्र न्यायालय असावे किंवात्या केसेस फॅमिली कोर्टाकडे वर्ग कराव्यात, अशी महिला संघटनांची मागणी आहे. कायदा हा परिस्थितीनुसार, घटनांनुसार आणि जनरेट्यामुळे तयार होतो. प्रत्येक कायद्याला इतिहास असतो. आपल्या समाजात कौटुंबिक हिंसाचार होतो हे मान्य असल्यामुळेच हा कायदा आला. आता जरा वेगळ्या परिस्थितीमुळे यात भर पडली इतकेच! शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आर्थिक इतके हिंसेचे प्रकार या कायद्यात सांगितलेले आहेत.
 
 
संयुक्त राष्ट्र संघाने नमुना कायद्याच्या आखणीत कौटुंबिक अत्याचाराची संकल्पना पुढीलप्रमाणे मांडलेली आहे. लिंगभेदावर आधारित शारीरिक, मानसिक गैरवर्तणूक जी कुटुंबातील व्यक्तीने कुटुंबातील स्त्रीविरुद्ध केली आहे. साध्या मारहाणीपासून तर गंभीर शारीरिक इजेपर्यंत, वा पळूवून नेणे, धमक्या देणे, धाकात ठेवणे, बळजबरी करणे, शाब्दिक शिवीगाळ, किंवा अपमानास्पद भाषा वापरणे, लैंगिक हिंसाचार, हुंडा वा हुंड्याशी संबंधित छळ, घरातल्या ज्येष्ठ स्त्रीचा छळ, अठरा वर्षांच्या आतील मुला-मुलींचा छळ कौटुंबिक हिंसाचाराच्या संकल्पनेत येतो.
 
 
लॉकडाऊनमुळे ती बाहेर जाऊन तक्रार करू शकत नाही, माहेरी जाऊ शकत नाही, फोनवर जरी तक्रार करायची म्हटले तरी ज्याच्याविरुद्ध तक्रार करायची ती व्यक्ती घरातच. सध्या जगभरातच हा प्रश्न आहे. चीनमध्ये लॉकडाऊननंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याचं आपण वाचलंच आहे. यावर इमोशनल फर्स्ट एड ही संकल्पना पुढे येत आहे. ऑनलाईन कौन्सिलिंग अनेक संघटनांनी सुरू केलेले आहे. 181 हा हेल्पलाईन नंबर महिला आयोगाने दिला आहे.
 
 
सधन, समृद्ध परिस्थितीत राहणार्‍या, उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण स्त्रियांच्या वाट्यालाही हे भोग का आले? आणि कशामुळे? झोपडपट्टीत मारहाण, शिवीगाळ, दारू पिऊन मारणं चालायचंच; पण मध्यमवर्गीयांत, उच्चमध्यमवर्गीयांत असं काही होतं हे आपण मान्यच करीत नाही. ‘स्वीपिंग अंडर द कार्पेट’ अशी आपली पांढरपेशी मानसिकता असते. एका सर्वेक्षणात असं आढळलं- पुरुषांची मानसिकता याला कारणीभूत आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि सहजपणे पचनी पाडता येत नाही अशी गोष्ट म्हणजे त्याची बायको एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची, त्याच्यावर अवलंबून नसलेली, स्वावलंबी व्यक्ती बनली आहे. तिच्या नोकरी किंवा व्यवसायातून येणारा पैसा प्रिय असला, तरी तिचं हे स्वत्व त्याला बोचतं, अस्वस्थ करतं. कुणाचंही आपल्यावाचून अडत नाही, ही जाणीव त्याला अस्वस्थ करते. आपल्या जीवनाचा पायाच व्यक्तिस्वातंत्र्याने काढून घेतला आहे असे वैफल्य येऊन तो मारहाण करतो.