कोरोनाची भीती; चाळीस ऐवजी सुटल्या वीसच बस

    दिनांक :22-May-2020
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने लॉकडाऊनच्या काळात प्रवाशी सेवा बंद केली होती. तब्बल 60 दिवसा नंतर शुक्रवार 22 रोजी जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी रा. प. महामंडळाने 40 बसेसचे नियोजन केले होते. पण, प्रवाशांअभावी केवळ वीसच बसेस सोडण्यात आल्या. जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी तळेगाव, आर्वी, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट या पाचही आगारातून 10 हजार किलोमीटर मर्यादेपर्यत बस गाड्या धावतील असे नियोजन केले होते. प्रवाशांची संख्या व प्रतिसाद पाहुन गाव खेड्यावर जाणार्‍या बसफेर्‍यात वेळप्रसंगी वाढ करण्याचे नियोजन होते. परंतु, लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या एसटीला प्रवासीच मिळत नसल्याने नियोजनाच्या केवळ अर्ध्याच बसेस सुटल्या.
 
 

bus_1  H x W: 0 
 
लॉकडाऊन शिथिल करत जिल्ह्यात 6 मे ते 10 मेपर्यत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने राज्य सरकारने आखुन दिलेल्या नियमात एसटी महामंडळाने सेवा सुरू केली होती. पण, 10 रोजी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने बस सेवा पुन्हा बंद करण्यात आली. थांबलेल्या बसच्या चाकांना आज शुक्रवार 22 रोजी पासुन गती देण्यात आली असली तरी कोरोनाच्या भीतीपोटी नागरिकांनी प्रवास करणेच टाळल्याने नियोजनाच्या अर्ध्यावरच एसटी महामंडळाला समाधान मानावे लागले.
 
 
 
वर्धा बस स्थानकावरून आज 22 रोजी दिवसभर्‍यात 15 गाड्या सोडण्यात आल्या त्यात सकाळी 13, दुपारी 1 आणि तहसील कार्यालयाच्या परवानगी ने छत्तीसगढ सीमेपर्यत 1 गाडी सोडण्यात आली तर उर्वरीत आगारातुन प्रत्येकी एक गाडी दुपार पर्यंत सोडण्यात आली. सायंकाळी गावात मुक्कामी जाणार्‍या बसेस पाठविण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवास सुरू झाल्याची माहिती गावापर्यत पोहोचेल अशी माहिती विभागिय नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.