लालपरी लागली धावायला अन् प्रवासीच नाही बसायला

    दिनांक :22-May-2020
|
- केवळ एका प्रवाशावर सोडावी लागली बस
तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
कोरोनाच्या भयकम्पामुळे प्रवाशांच्या सेवेत असलेली महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळची लालपरी 22 मार्चपासून सेवेतून बाद झाली होती. त्यामुळे प्रवाशांना लालपरीचा विसर पडल्यागत होता. आता अनेक दिवसाच्या प्रदीर्घ कालानंतर शुक्रवारी लालपरी बस स्थानकावर आली खरी, मात्र प्रवासीच नसल्याने चालक-वाहक प्रवाशांची वाट पाहत असल्याचे चित्र निर्माण झाले. केवळ एका प्रवाशाच्या भरवशावर ही बस स्थानकातून पुढे गेली.
 
 

bus_1  H x W: 0 
 
काही ठराविक मार्गावरच ही लाल परी धावणार आहे. दर्यापूर ते अमरावतीकरिता सोयीची असलेली बस मात्र वलगाव पर्यंतच जात असल्याने अधिक गैरसोयीची दिसून आली. प्रवासी नसल्याची खंत चालक व वाहकांनी व्यक्त केली. शुक्रवारी सकाळपासून दर्यापूर बस स्थानकावर लालपरी प्रवाशांकरिता उपस्थित झाली. बसस्थानक मात्र निर्मनुष्य होते. दर्यापुरातून आसेगाव, वलगाव, अंजनगाव, परतवाडा , भातकुली आदी ठिकाणी जाणार्‍या बसेस तयार होत्या, मात्र प्रवासी नसल्याने अनेक फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. एक, दोन फेर्‍यात केवळ एक प्रवासी असल्यानंतर ही बस रवाना करण्यात आली. चालक, वाहक यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले होते. 10 वर्षा खालील व 65 वर्षा वरील व्यक्तींना प्रवास करण्यास मनाई करण्याचे आदेश होते. त्या नुसार वाहकाना सूचित करण्यात आले होते.
 
 
 
एसटी बसच्या प्रवासाकडे प्रवाशांची पाठ
मोर्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रवासाकडे तालुक्यावासीयांनी स्पष्ट पाठ फिरविली असल्याचे शुक्रवारी दिसून आले. दोन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मोर्शी बस स्थानकातून मोर्शी ते चांदूरबाजार जाणारी बस धावली. कोरोना महामारीच्या भीतीमुळे देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशभरातील सर्व वाहनांना प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली होती. राज्यातही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना प्रवास बंदी घातली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना प्रवासाची मुभा राज्य सरकारने दिल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांतर्फे मध्यप्रदेश सीमेपर्यंत मध्यप्रदेशातील परप्रांतीय मजुरांना सोडण्यात आले होते. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर राज्य सरकारकडून 22 मे पासून जिल्हा अंतर्गत एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली. मोर्शी आगारातील 11 बसेसला 138 फेर्‍याच्या माध्यमातून 4 हजार 305 किलोमीटरचा प्रवास निश्चित करून दिलेला आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांनी एसटीच्या प्रवासकडे पाठ दाखविली आहे.