जैवविविधतेची हानी म्हणूनच कोरोना पाजतोय पाणी!

    दिनांक :22-May-2020
|
- आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस
निखिल केळापुरे
निसर्गात मानवासह असंख्य वनस्पती, पशू, पक्षी व सूक्ष्मजीव आढळून येतात. मानव वगळता इतर सजीव प्राणी एकमेकांच्या सहाय्याने सुखरुप जीवन जगत असतात. मानव हा स्वत:च्या प्रगतीसाठी निसर्गावर आपले वर्चस्व निर्माण करीत असून यात तो काही प्रमाणात यशस्वीदेखील झाला. मात्र यातूनच जैवविविधतेची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगात आपले पाय रोवल्यामुळे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी मानवाने एकत्रित येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत जगातील पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
 
 
bio_1  H x W: 0
 
जैवविविधतेचा अमूल्य आणि समृद्ध असा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. पक्षी, प्राणी, सूक्ष्मजीव, गवत, वनस्पती, जंगले यांसारख्या विभिन्न सजीव प्रजातींची प्रचंड संख्या आपणास पाहायला मिळते. जैविक प्रजातींच्या अस्तित्वासाठी, वाढीसाठी, निरोगी पर्यावरण व त्याच्या संवर्धनासाठी जैवविविधता महत्त्वाची भूमिका पार पाडते. तसेच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यास मदत करते. परंतु मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे निसर्गाची कमालीची हानी झाली आहे. वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल तसेच अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून मानवाला याचा फटका बसतो, हे बèयाच घटनांमधून दिसून आले आहे.
 
 
 
सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात संपूर्ण जग सापडले आहे. एवढ्याशा विषाणूच्या समस्येमुळे मानव त्रस्त झाला आहे. चंद्रावर झेपावणाऱ्या मानवाला कोरोनाच्या विषाणूने घरी बसविले. मानव लॉकडाऊन झाल्याने निसर्गात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. जग जिंकण्याच्या नादात मानव निसर्गाला संपविण्यास निघाला होता. निसर्गाच्या हातातच मानवी आयुष्याची दोरी आहे, हे मानवाला आतातरी कळणे गरजेचे आहे. देश आणि पर्यायाने राज्यात जैवविविधतेची हानी थांबविण्याच्या दृष्टीने सर्वांनी विशेषत: राज्यांच्या जैवविविधता मंडळांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र मागील दोन अडीच महिन्यांपासून राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष निवृत्त झाल्याने हे मंडळ नावापुरतेच अस्तित्वात आहे. आता अध्यक्षाविनाच हे मंडळ वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहे.
जैवविविधतेचा ऱ्हास टाळण्यासाठी प्रयत्न व्हावा
कोरोनापासून बचावासाठी आयुर्वेदात वनऔषधी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा बऱ्याच वनस्पती औषधी जैवविविधतेच्या माध्यमातून आपणास मिळतात. मात्र भारतात त्या औषधी नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. संचारबंदीमुळे उद्योगांचा आणि मानवाचा जंगलांमधील हस्तक्षेप थांबला. निसर्ग पुर्ववत होत आहे. आगामी काळात जैवविविधता नष्ट होईल असे निर्णय मानवाने टाळावे. आयुर्वेद आणि इतर पर्यावरण तज्ज्ञांशी मंथन करून, या प्रजाती कशा वाचविता येतील यासाठी प्रयत्न व्हावे. यंदाचा जैवविविधता दिवस 'प्रत्येक समस्येचे निराकरण निसर्गातच आहे' या थीमवर आहे. कोरोनाने मानवाला जैवविविधता वाचविण्याची संधी दिली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावे.
किशोर रिठे, वन्यजीव व जैवविविधता तज्ज्ञ
जैवविविधता मंडळाकडे संपूर्ण माहिती
जैवविविधता मंडळाकडे राज्यात कोणते कीटक, कोणत्या वनस्पती आहेत याचा अहवालच नाही. तसेच या मंडळाने राज्यातील जैवविविधतेची हानी टाळण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याचा आरोप सातत्याने होत असतो. मात्र हे पूर्णत: चुकीचे असून, मंडळाकडे सर्व प्रकारच्या सूक्ष्म कीटक आणि वनस्पतींची नोंद आहे. मंडळातील विविध समित्या ९९ टक्के तयार असल्याची माहिती जैवविविधता मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी दिली.