कोरोनाग्रस्त बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण नागपुरात

    दिनांक :22-May-2020
|
-पालकमंत्र्यांची कोरोना योद्धांना शाबासकी
-बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के
नागपूर, 
नागपुरात कोरोनाबाधितांपैकी ७४ टक्के रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. प्रभावी व परिणामकारक उपचारामुळेच हे शक्य झाल्याचे गौरवोद्गार आहेत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे. त्यांचे हे गौरवोद्गार म्हणजे डॉक्टर, परिचारीकांसह समस्त कोरोना योद्धांना दिलेली शाबासकी आहे.
 
कोरोनाबाधित रुग्णांवर भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ४०९ नागरिकांपैकी सकाळी २९९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण भारतात ४०.४ टक्के तर राज्यात २६.३ टक्के एवढे असून त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात तसेच देशातही सर्वाधिक आहे.
कोरोना बाधितांच्या तपासणीसह उपचारासाठी मेडिकल व मेयो रुग्णालयात स्वतंत्र अद्यावत कोविड रुग्णालय कार्यान्वित झाले असून वार्डही आहेत. उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
 
 
 
meyo ngp_1  H x
 
 
 
कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी शहरात पाच अत्याधुनिक प्रयोगशाळा असून यामध्ये आतापर्यंत शहरातील ९ हजार ८१८ स्वॅबच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधितांमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये जगात सर्वाधिक जर्मनी येथील रुग्ण बरे होण्याचे ८७.९, इटली ५३.३, फ्रान्स ३४.९, अमेरिका २३.३, रशिया २७.७ आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर महाराष्ट्रात २६.३ टक्के एवढे आहे. त्या तुलनेत नागपूर शहरात पूर्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. त्यांच्या या शाबासकीमुळे डॉक्टर्स, परिचारिकांसह समस्त कोरोना योद्धांमध्ये उत्साह संचारला आहे.
 
 
दरम्यान, आज सायंकाळी मेडिकल रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या ७ रुग्णांना दुपारी सुटी देण्यात आली. त्यात बाबा फरीद नगरातील ८५ वर्षांचा वृद्ध, तकिया मोमीनपुरातील ७३ वर्षांची वृद्धा, ६० वर्षांची वृद्धा, २० वर्षांची, ३६ वर्षे, ३५ वर्षांच्या महिला, तसेच चंद्रपूरच्या रुग्णाचा समावेश आहे. मेयो रुग्णालयातून मोमीनपुरातील २ व सतरंजीपुरातील १, अशा तीन पुरुषांची सुटी झाली.
 
 
मेयो रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बजेरियातील एका १८ वर्षांच्या तरुणीचा नमुना मेयो प्रयोगशाळेत रात्री पॉझिटिव्ह आला. मेयोत काल ३६१ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी १ पॉझिटिव्ह तर ३६० निगेटिव्ह आले. आज दुपारपर्यंत १०० नमुने तपासण्यात आले व ते सर्व निगेटिव्ह होते. आज दुपारपर्यंत एम्समध्ये १२३ नमुने तपासण्यात आले. त्यात २ नमुने नागपूरचे तसेच ३ नमुने गोंदियाचे पॉझिटिव्ह आले. व्हीएनआयटी मध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या गड्डीगोदाममधील संशयिताचा हे नमुने आहेत. नागपुरात बाधितांची एकूण संख्या सायंकाळपर्यंत ४०९ झाली आहे. पाच प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासणी सुरूच होती. मेयो व मेडिकलमध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या सायंकाळी ९८ होती.
 
दैनिक संशयित ६६
एकूण संशयित २२५७
एकूण पॉझिटिव्ह ४०९
डिस्चार्ज पॉझिटिव्ह २९९
डिस्चार्ज संशयित २३०९
आज अलगिकरण केलेले संशयित २२
अलगीकरणातून घरी पाठवले १४६
अलगीकरणातून रुग्णालयात पाठवले १२
सध्या अलगीकरण कक्षात २०१४
पाठपुरावा सुरू असलेले गृहविलगित ४००