महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांचे ताशेरे

    दिनांक :22-May-2020
|
- परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निर्देश
तभा वृत्तसेवा
मुंबई,
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षेबाबत घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतीम वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्र पाठवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतीम वर्षाच्या अंतीम सत्राच्या परीक्षा रद्द करून आधीच्या गुणांवर आधारीत मूल्यांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती. कुलपतींना याबाबतीत अंधारात ठेवण्यात आल्याचे कळते.
 

exam_1  H x W:  
शुक्रवारी राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना एक पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा कधी घ्यायच्या याचा तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. अंतीम वर्षाच्या परीक्षा न घेणे हा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उघडउघड उल्लंघन आहे. अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्या म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे शिफारस करण्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांची कृती हा अवास्तव हस्तक्षेप असून याबद्दल त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, असेही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.
 
 
 
सामंत यांचे पत्र हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग तर आहेच पण महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदींचाही भंग आहे. अंतीम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची शिफारस करण्यापूर्वी त्यांनी ययाची आपल्याला कल्पना दिली नाही. परीक्षा न घेता विद्यार्थ्याला पदवी देणे हे तात्त्विकदृष्ट्याही योग्य नाही आणि असेही योग्य नाही. विद्यापीठ कायद्याचेही ते उल्ल्घन आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणावर, नोकरीवरी गदा येऊ शकते, असेही राज्यपाल म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात दहावी आणि बारावीच्या विविध मंडळांच्या परीक्षा घेण्यासाठी गृह मंत्रालयाने परवानगी दिली होती, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.