भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :22-May-2020
|
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडकविला निषेधाचा फलक
तभा वृत्तसेवा
अमरावती,
भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या ‘माझं अंगण हेच रणांगण - महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या घरूनच केलेल्या या अनोख्या आंदोलनात शेतकरी व सर्वसामान्य वर्ग सुद्धा सामील झाला होता.
 

nishedhnond_1   
 
सर्वप्रथम माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व भाजपाच्या ग्रामीण अध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन काळे झेंडे दाखविले. कापसाच्या गादीवर निषेधात्मक घोषणा लिहून मुख्यमंत्र्यांना भेट पाठविली. भाजपा ग्रामीणतर्फे तिवसा, चिखलदरा, वरुड, मोर्शी, अचलपूर, अंजगाव सुर्जी, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, भातकुली, धारणी, दर्यापूर, चांदुर बाजार, नांदगाव खंडेश्वर व अमरावती या 14 ही तालुक्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून, काळे झेंडे, निषेधात्मक फलक व घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या केसेस, रेंगाळत असलेली कापूस खरेदी, शेतमालाचे नुकसान, रुग्णांची फरफट, शेतकरी कर्जमाफी, सर्व सामान्य जनतेचे हाल याबाबत सरकारच्या विरोधात घोषणा आपल्या घरातून दिल्या गेल्या.
 
 
 
भाजपाच्या आंदोलनात, शेतकरी व सर्वसामान्य वर्ग उत्स्फूर्तपणे सामील झाला. जिल्हाभर झालेल्या या आंदोलनात भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. अरुण अडसड, आ. प्रताप अडसड, आ. प्रवीण पोटे, माजी आमदार रमेश बुंदीले, माजी आमदार प्रभूदास भिलावेकर, गजानन कोल्हे, जिल्हा परिषद गटनेते प्रवीण तायडे, भाजपाचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, भाजपाचे नगराध्यक्ष व सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, भाजपा तालुकाप्रमुख, कार्यकर्ते यांनी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
 
 
 
अमरावती शहरातही महाविकास आघाडीचा निषेध
अमरावती शहरात भाजपाच्या 7 मंडळातील 471 बुथवर आणि 4 हजार स्थानावर 15 ते 16 हजार कार्यकर्ते, नागरिक यांनी काळ्या फिती, मास्क, रिबीन व कपडे घालून आणि हातात आघाडी सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलन केले. प्रमुख नेत्यांनी भाजपा कार्यालयासमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, महापौर चेतन गावंडे, प्रा. रवी खांडेकर, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, तुषार भारतीय, प्रा. दिनेश सुर्यवंशी, राधा कुरील, सुनील काळे, गजानन देशमुख, राजेश अखेगावकर, दीपक पोहेकर यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चा, महिला मोर्चाने परिश्रम घेतले.