कृषि विभागाने सरासरी उत्पादन दाखविले कमी

    दिनांक :22-May-2020
|
- मका खरेदीत आदिवासी शेतकरी अडचणीत
- सर्व माल खरेदी करण्याची आ. पटेलांची मागणी
तभा वृत्तसेवा
धारणी,
धारणी तालुक्यात रब्बी मक्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी 40 क्विंटल होत असतांना तालुका कृषी अधिकार्‍यांनी सरासरी उत्पन्न 24 क्विंटल दिल्याने आदिवासी महामंडळाकडून सुरू असलेल्या हमीभाव मका खरेदीत विविध अडचणी येत आहेत. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मेळघाटच्या शेतकर्‍यांचा पूर्ण मका बी.डी.टी.डी.सी. ने खरेदी करावा, अशी मागणी केली आहे.
 
 

amdar_1  H x W: 
 
 
 
धारणी तालुक्यातील धारणी, सावलीखेडा, हरिसाल तथा बैरागड अशा चार ठिकाणी नाफेडची हमीभाव मका खरेदी 20 मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. एजन्ट म्हणून महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कार्यालयामार्फत प्रति क्विंटल 1760 रुपये प्रमाणे मका खरेदी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने निश्‍चित करुन दिलेल्या हमीभावानुसार धारणी तालुक्यात चार केंद्रावर मका खरेदी सुरु करण्यात आली. परंतु अनेक शेतकर्‍यांचा पूर्ण माल घेण्यास नकार देण्यात येत असल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
 
 
 
शेतकर्‍यांनी आपल्या समस्या आ. राजकुमार पटेलांना सांगितल्या. पटेल यांनी या विषयी संपर्क करुन पूर्ण उत्पादन खरेदी करण्याची विनंती केली. या विषयी प्राप्त माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी यांनी मक्याचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 24 क्विंटलचे प्रमाणपत्र दिलेले आहे. ही कमाल मर्यादा नसून सरासरी आहे. याचे भान महामंडळाला नाही. विशेष म्हणजे धारणी भागात मक्याचे उत्पादन हेक्टरी 40 क्विंटल पेक्षा जास्त सुध्दा होत असते. पण तालुका कृषी अधिकारी मडावी यांनी सरासरी उत्पन्न 24 क्विंटल दिल्याने शेतकर्‍यांचा माल केंद्रावरुन परत करण्यात येत आहे. प्रश्‍न असा आहे की, शेतकर्‍यांजवळ इतर कोणत्याही मार्गाने मका येणे शक्य नाही. लॉकडाऊन असल्याने शेतकर्‍याने केंद्रापर्यंत आणलेला पूर्ण माल महामंडळाने खरेदी करावा, अशी स्पष्ट मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केलेली आहे. बातमी लिहेस्तोवर 380 क्विंटल मका खरेदी झालेला होता. सरासरी वाढवावी किंवा सरासरीला गृहित धरु नये व शेतकर्‍याचा पूर्ण माल खरेदी करावा, अशी मागणी होत आहे.