अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या 355 तर मृत 23

    दिनांक :22-May-2020
|
- आज झाला दोघांचा मृत्यू
- एका दिवसात वाढले 14 बाधित
- 15 रूग्णांना दिली सुटी
अकोला,
अकोला शहरात कोरोनाचे जाळे वेगाने फैलत असून आज 22 मे रोजी दोघा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 350च्यावर गेली आहे.आज एकाच दिवसात पुन्हा कोरोना बाधित 14 रूग्ण वाढले असून 15 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.ही स्थिती पाहता अकोला शहरात आणखी काय घडेल या चिंतेत नागरिक व प्रशासन आहे.
 
 
corona_1  H x W
 
आज 22 मे रोजी कोरोना संसर्ग तपासणीचे 158 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 144 अहवाल नकारात्मक तर 14 अहवाल बाधितचे आले आहेत. 21 मे रोजी आणखी 15 जणांना सुट्टी देण्यात आली तर दोन जणांचा मृत्यू झाला,त्यांचे अहवाल आज बाधितचे आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात कोरोना बाधितचे अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 355 झाली आहे. प्रत्यक्षात 126 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.आतापर्यंत एकूण 206 लोकांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आजअखेर 23 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
 
 
 
आज आढळले 14 बाधित
आज 22 मे रोजी 14 जणांचे कोरोना अहवाल बाधितचे आले आहेत. आज सकाळी बाधित असलेल्या रूग्णांच्या आलेल्या अहवालात 3 महिला व 5 पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील बाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जिप शाळेतील अलगीकरण कक्षातच होती. तर आज सायंकाळी बाधितच्या आलेल्या सहा अहवालात 1 महिला व 5 पुरुषांचे अहवाल आहेत. यात जुने शहर, अकोट फैल, गोकुळ कॉलनी, जवाहर नगर, मलकापूर अकोला, हमजा प्लॉट वाशिम बायपास व मुजावरपुरा ता. पातूर येथील रहिवासी आहेत.
 
 
 
दोघांचा मृत्यू
दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण हे मंगळवार 19 रोजी दाखल झाले होते. ते त्याच दिवशी मयत झाले. त्यांचे अहवाल आज बाधितचे आले आहेत. त्यातील एक रुग्ण 50 वर्षीय महिला असून ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक 52 वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.
 
 
15 जणांना सुटी
तसेच गुरूवार 21 रोजी रात्री 15 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यातील 12 जण कोविड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात माळीपुरा येथील 4, रेल्वे कॉलनी येथील 3, लकडगंज येथील 2, अकोट फैल येथील 2, तर सिटी कोतवाली, समता नगर, पूरपिडीत क्वार्टर, गुलजारपुरा येथील प्रत्येकी 1 याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.