उत्तरप्रदेशने केले राजस्थान सरकारचे बसभाडे चुकते

    दिनांक :22-May-2020
|
- रक्कम आकारल्याने बोचरी टीका
नवी दिल्ली, 
राजस्थान सरकारने विद्यार्थ्यांना कोटा येथून उत्तरप्रदेशात पोहोचवून देणार्‍या बसेसच्या भाड्यापोटी आकारलेले 36.36 लाख रुपये योगी आदित्यनाथ सरकारने आज शुक्रवारी चुकते केले. मात्र, या प्रकारावरून उत्तरप्रदेश सरकारने गहलोत सरकारवर बोचरी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही, गहलोत सरकारचा हा प्रकार अमानवीय असल्याचा आरोप केला. कॉंग्रेस पक्षाच्या एक हजार बसेसच्या प्रकरणानंतर आता नवा वाद निर्माण होण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.
 
 

rasjthan bus_1   
 
 
कोटा येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासादरम्यान कोरोना लॉकडाऊनमुळे उत्तरप्रदेशातील काही विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना परत आणण्यासाठी आम्ही बसेस उपलब्ध केल्या होत्या. मात्र, अतिरिक्त गाड्यांची गरज होती. तशी व्यवस्था झाल्यानंतर एप्रिल महिन्यात कोटा येथील राजस्थान परिवहन महामंडळाच्या बसेसमधून विद्यार्थ्यांना आग्रा आणि मथुरा येथे आणण्यात आले होते. याबाबतचे बिल राजस्थान सरकारकडून बुधवारी परिवहन विभागाला प्राप्त झाले. त्यामुळे बसेसच्या भाड्याची 36.36 लाख इतकी रक्कम आज चुकवण्यात आली, अशी माहिती उत्तरप्रदेश राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राज शेखर यांनी दिली. यानंतर मात्र भाडे मागणार्‍या राजस्थान सरकारवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी जोरदार टीका केली आहे. यातून राजस्थान सरकारचा अमानवीय चेहरा समोर आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.