धारणी व परतवाड्यात एसटीला अत्यल्प प्रतिसाद

    दिनांक :22-May-2020
|
- दोनही तालुक्यात केवळ दहा फेर्‍या
तभा वृत्तसेवा
अचलपूर,
गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली लालपरी शुक्रवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी धावली. धारणी, चिखलदरा, अंजनगाव, वलगाव व चांदुर बाजार असा पहिल्या दिवसाचा प्रवास केला. मात्र, प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादाने दिवसभर्‍यात आठच फेर्‍या करण्यात आल्या.
 
 

dharni_1  H x W 
 
 
महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटीची जिल्हा अंर्तगत प्रवासी वाहतूक शुक्रवारी सकाळी 7 वाजतापासून सुरु झाली. गेल्या दोन महिन्यापासूनच्या लॉकडाऊनमुळे कधीही न थांबणार्‍या लालपरीलाही आराम करावा लागला होता. शासनाने जिल्हा अंर्तगत विशेष झोन व्यतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी सकाळी परतवाडा आगाराचे बल्लाठ यांनी हिरवी झेंडी दाखवत बस रवाना केली. परतवाडा ते चांदुरबाजार पहिली फेरी रवाना केली. यावेळी अत्यंत अल्प असा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळाला.
 
 
 
परतवाडा आगारातून धारणी, चिखलदरा, चांदुरबाजार, वलगाव व अंजनगाव पर्यंतच बस सोडण्यात आल्या. अमरावती मार्गावर वलगाव बस स्टॅड पर्यंतच बसेस सोडण्यात आल्या. पहिला दिवस असल्याने प्रवाशांनाही बसेस सुरू होणार आहे, याची माहिती नसल्याने अल्प प्रतिसाद मिळाला, जसे जसे प्रवासी वाढतील, तशा तशा फेर्‍या देखील वाढवण्यात येतील, असे आगार प्रमुख बल्लाळ यांनी सांगितले.