मोहन-मंजिरी

    दिनांक :22-May-2020
|
 

jodi _1  H x W: 
 
वर्षा देशपांडे  
 
मज नकोत कुबड्या
अथवा शिड्या कुणाच्या
लागून ठेच चढणे
माझा स्वभाव आहे...
 
 
स्वतःमधील आत्मतेज आणि ऊर्जा ओळखून मोहन कुलकर्णी सरांनी स्वतःबद्दल वरील पंक्ती लिहिल्या आहेत, असेच वाटते. आज त्यांनी प्रगतीचा कितीतरी मोठा पल्ला आपल्या जीवनात गाठला आहे. आम्ही लेखिका संस्थेचा वेल गगनापर्यंत चालला आहे. भारतातल्याच नव्हे, तर परदेशातल्या लेखिका या संस्थेमध्ये सहभागी झाल्या आहेत. या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. या संस्थेत मोहन सरांच्या कल्पनेतून वैविध्यपूर्ण निरनिराळे ऑनलाईन कार्यक्रम होत असतात. आंतरराष्ट्रीय कवयित्री संमेलन, बहुभाषी भाषा महिला साहित्य संमेलन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, असे अनेक कल्पक कार्यक्रम! या सुंदर विविध कार्यक्रमाची ही किमया कशी घडते? त्यावर सरांच्या पत्नी मंजिरीताई म्हणाल्या, ही सर्व माझी सवत कल्पना तिची किमया! मी आश्चर्याने म्हटलं कोण ही कल्पना? आणि सवत? तर म्हणाल्या की अहो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती त्यांच्या सोबतच असते. आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारत असते. आणि त्यातूनच कल्पक कार्यक्रम होतात. आम्ही लेखिका सारखी संस्था निर्माण होते. अशी माझी ही सवत आहे. आणि नंतर उलगडा झाला की, ही कल्पना म्हणजे सरांच्या मनातील विविध कल्पना होत! मी त्यांना म्हटले, ही यांच्या सोबत असलेली कल्पना म्हणजे मंजिरीताई तुमचे अमूर्त स्वरूप आहे! त्या गोड हसल्या. मी म्हटले, सर कल्पनेमध्ये एवढे गुंतलेले असतात तर तुम्हाला काय वाटतं? यावर त्या माउलीने सात्त्विक उत्तर दिले, मी ह्यांच्यात सामावून गेले आहे. नवर्‍याला सहकार्य करावे, त्याला समजून घ्यावे, त्याच्याशी एकरूप व्हावे, हीच माझी विचारसरणी आहे. मी म्हटले, तुमचे लग्न कोणत्या साली आणि कधी झाले? तर ताई म्हणाल्या, 9 जून 1979 ला मी मंजिरी मोहन कुलकर्णी झाले. 41 वर्षे आमच्या लग्नाला झालीत. माझा प्रश्न, तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळाले का? त्या म्हणाल्या, ह्यांचे घर अत्यंत छोटे होते. अॅडजेस्ट करावे लागले. माझी एकच यांच्याकडून अपेक्षा होती ती म्हणजे स्वतःचे घर असावे आणि ही माझी अपेक्षा दुसर्‍याच वर्षी पूर्ण झाली.
 
आम्ही स्वतःच्या घरात राहायला गेलो. त्यावर सर म्हणाले, ही लक्ष्मीच्या पावलांनी आली माझ्या घरी! मी म्हटलं, लग्नाआधी ओळख होती का? सर म्हणाले, नाही, ओळख वगैरे काही नव्हती. त्या वेळी मासिकात स्थळांची यादी येत असे. रोहिणी मासिकात आम्ही दोघांनीही नाव नोंदवले होते. बोलणे होऊन तिच्या घरचे लोक मुलगी घेऊन भेटायला आले आणि पसंती झाली. तुम्हाला नेमके काय आवडले मंजिरीताईमध्ये? सर म्हणाले, तिचा मनमोकळा स्वभाव आणि मुख्य म्हणजे डोळ्यांतले भाव! अत्यंत सात्त्विक असे भाव तिच्या डोळ्यांत आहेत. गाईच्या डोळ्यांत जे भाव दिसतात ते मला तिच्या डोळ्यांत दिसले आणि मनाने कौल दिला की, ही मला छान साथ देईल, अपेक्षा पूर्ण करेल आणि तसेच घडले. मी विचारले, तुमचं करीअर कसं घडलं? सरांनी त्यावर जे सांगितलं त्याने मी अंतर्मुख झाले. सर म्हणाले, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. मी सुरुवातीला घराघरांत पेपर टाकायचं काम करायचो. महिन्याला केवळ पाच रुपये मिळायचे. काही घरी देवाच्या पूजेचे काम करून देत असे. त्याचे दोन रुपये मिळत. नंतर एका जाहिरात एजन्सीमध्ये नोकरी लागली. ती नोकरी 11 ते सायंकाळी सात होती. मी सकाळी कॉलेज करून जात असे. मात्र, ग्रॅज्युएशन झालं नाही. पुढे तरुण भारत, पुणेला मला काम मिळालं. तेव्हा मी पत्रकार झालो.
 
 
मी ठरवूनच पत्रकार झालो आणि ठरवूनच पत्रकारितेतून बाहेर पडलो. माझ्या बर्‍याच ओळखी झाल्या होत्या. म्हणून मी पत्रकारिता सोडून निरनिराळे उपक्रम राबवले. मी सरांना म्हटले की, नोकरी सोडली होती तर चालायचे कसे? सर म्हणाले, आम्ही मोठं घर विकलं, छोट्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. बाकीचे पैसे बँकेत ठेवून व्याजावर आमचं चालायचं. तसेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून मला मानधन मिळतं. या सर्वांच्या साह्याने उपक्रम चालवतो. मी म्हटले, तुमचे उपक्रम सांगा? त्यांनी जे उपक्रम सांगितले त्याचा एक स्वतंत्र लेखच होईल. असामान्य असा उपक्रम म्हणजे समाज सुधारक आगरकर संपादित सुधारकची शताब्दी! जगभरातील वृत्तपत्रांच्या इतिहासातील समाजाने साजरी केलेली ही एकमेव शताब्दी आहे. 500 पत्रकार, 25 संपादक, 10 मंत्री आणि 1200 नागरिकांची उपस्थिती! हा दैवदुर्लभ सन्मान मराठीला चौफेरने मिळवून दिला. सर चौफेरचे संस्थापक, अध्यक्ष आहेत, हे सांगणे न लगे! त्याचप्रमाणे 1972 साली कला सुगंध साहित्य संघ या संस्थेची स्थापना मोहन सरांनी केली. अर्थात त्याचे अध्यक्ष तेच होते. या संस्थेने आणिबाणीच्या दिवसात घेतलेले पहिले राज्यस्तरीय कथालेखिका संमेलन कमालीचे गाजले आणि यशस्वीही झाले. असे अनेक उपक्रम सरांच्या नावे आहेत. मातृदिनाच्या दिवशी कलावंताच्या तसेच सैनिकाच्या आईच्या सत्काराचे कार्यक्रम, कन्यादिनाच्या दिवशी कलावंताच्या कन्यांचा सन्मान, फादर्स डेला सेवाभावी ज्येष्ठ वडिलांचा आदर, सत्कार असे कितीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम सरांचे आणि मंजिरीताईचे मिळून चालू असतात. सरांना पुरस्कारही अनेक मिळाले. सर्वांचा उल्लेख करू शकत नाही, एवढी ती लिस्ट मोठी आहे. महाराष्ट्र शासनाचा पत्रकारांसाठी सुरू केलेला विकास वार्ता राज्यस्तरीय पुरस्कार पहिल्याच वर्षाचे मानकरी म्हणून मोहन कुलकर्णी सरांना मिळाला! अजून एक उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे मराठी पत्रकारांचे कुलगुरू आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार देऊन मोहन कुलकर्णी सरांना 2000 मध्ये सन्मानित केले.
 
 
सरांना म्हटले, एखादी हृद्य आठवण? सर म्हणाले, मी ज्या आठवणीबद्दल सांगणार आहे ती आठवण मनात घर करून बसली आहे. म्हणजे 1948 ला गांधी हत्या झाली त्या वेळी आम्ही सातारा जिल्ह्यातील सांगवड या गावी राहात होतो. त्या गावातील सर्व ब्राह्मणांची घरे जाळली. त्यात आमचे घर जाळले. आमची शेती कूळ कायद्यात गेली आणि आम्ही सर्व कराडला आलो. एका खोलीमध्ये पाच माणसे राहू लागलो. घर जळणं ही फार क्लेशकारक घटना आहे. लग्न झालं. स्वतःचं घर बांधलं. माझे वडील 80 वर्षांचे होते. त्यांना घर बांधले याचा फार आनंद झाला. घर जळलं आणि नवनिर्मितीपण झाली. विरोधाभास. स्वतःच्या घरात चार महिने आनंदात माझे वडील राहिले. मात्र, दसर्‍याच्या दिवशी त्यांची तब्येत बिघडून ते गेले. ते आनंदात, समाधानात स्वतःच्या घरात गेले. अशी ही आनंद आणि दुःखमिश्रित माझी आठवण! मंजिरीताईंना म्हटलं, तुमची हृद्य अशी एखादी आठवण सांगा. तर म्हणाल्या, आम्ही मातृदिन साजरा केला. तो फार वेगळ्या पद्धतीने! आमच्या घरच्या मातांचा विधिवत सत्कार केला. यज्ञ, धार्मिक विधी केले. खर्‍या अर्थाने मातृपूजा झाली. कारण, या पूजेमध्ये आमच्या दोघांच्या आया तर होत्याच, पण यांची मावशी, भावाची सासू याही ज्येष्ठ माता होत्या. ही आठवण सदैव स्मरणात राहते. मी सरांना म्हटले, तुम्ही हे सगळं मिळवले याचे रहस्य काय? सरांनी उत्तर दिले, प्रामाणिकपणा, निरपेक्ष राहायचं! पत्नीला मान द्यायचा! ही गोष्ट खरी आहे. मंजिरीताईला मोहन सर नेहमीच मान देतात. प्रत्येक कार्यक्रमात मंजिरीताई असतात. हे आजकालच्या मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अशी ही मोहन सर आणि मंजिरीताई यांची एकमेकांशी एकरूप झालेली, तादात्म्य पावलेली जोडी!
 
 
आणि आज दुग्धशर्करा योग आला आहे. 22 मे सरांचा वाढदिवस! दरवर्षी सरांकडे पूजा होते. नातेवाईक एकत्र येतात. पण, या वर्षी कोरोनामुळे काहीच नाही! माझ्याकडून सर आपल्याला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! आणि माझा ‘जोडी तुझी माझी’ हा लेख तुम्हाला माझ्याकडून आज वाढदिवसाची गिफ्टच की!