कोरोनाबाधित मृतदेह दफन करण्यावर उच्च न्यायालयाचा निर्वाळा

    दिनांक :22-May-2020
|
मुंबई,
कोरोना व्हायरसमुळे बळी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्याने कोरोनोचा समूह संसर्ग पसरतो, या दाव्याचे समर्थन करणारा कोणताही वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही, असे मुंबई उच्च न्यालयायाने आज शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यासोबतच मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाबाधितांचे दफनविधी करण्यासाठी वांद्रे कब्रस्तान वापरण्याच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच सदर प्रकरण हे दंड आकारण्यासाठी योग्य होते. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी ही याचिका दाखल केलेली असल्यामुळे दंड आकारत नाही, असे नमूद करत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
 
mumbai high court_1 
 
वांद्रे पश्चिम येथील कोकणी मुस्लिम कब्रस्तानमध्ये कोरोनामुळे दगावलेल्यांचे मृतदेह व्यवस्थित दफन न केल्यास कोरोना विषाणूचा समूह संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाबाधितांचे मृतदेह येथे दफन करण्यास मर्यादा घालण्यात यावी, अशी मागणी काही स्थानिकांनी केली होती. येथील स्थानिक रहिवासी प्रदीप गांधी आणि इतरांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव हा तोंडातून निघणाऱ्या द्रावांमुळे पसरतो, असे सांगत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने १५ मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेकडे कब्रस्तान विश्वस्तांच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. तसेच, केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांचा या दफनविधी दरम्यान वापर करण्यात येत असल्याचेही सांगितले होते. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. त्याविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात पालिकेची बाजू ऐकून निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे वर्ग केले.
त्यानंतर वांद्रे कब्रस्तानमधील विशिष्ट जागेत कोरोनाबाधितांचे मृतदेह दफन केले जाणार असून त्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याची माहिती मुंबई पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात सादर केली. त्यांची बाजू ऐकून उच्च न्यालयाने यावर आपला निकाल राखून ठेवलेला निकाल आज शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी जाहीर केला.