आता २० मिनिटांत ओळखता येणार कोरोना रुग्ण

    दिनांक :22-May-2020
|
-प्रयोगशाळेची गरज नसल्याचा ब्रिटन सरकारचा दावा
लंडन,
अवघ्या 20 मिनिटांत कोरोनाबाधित ओळखता येणार असल्याची सुखद माहिती ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिली आहे. पीसीआर चाचणी असे तिचे नाव असून, ती क्लिनिकल सर्व्हेमध्ये यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय प्रयोगशाळेची गरज नसल्याचा दावाही सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
 
 
test_1  H x W:  
 
 
सध्या जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना अधिकाधिक नागरिकांची चाचणी घेण्याचे आव्हान अनेक देशांसमोर उभे ठाकले आहे. आरोग्य चाचणी घेतल्यानंतर त्यासंबंधी अहवाल येण्यास उशीर होत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढत जातो, असे तज्ज्ञ सांगत असतानाच, आता काही मिनिटांतच कोरोनाबाधित ओळखता येणार असल्याची नवी माहिती पुढे आली आहे.
 
 
या संदर्भात आरोग्यमंत्री हॅनकॉक यांनी सांगितले की, एखाद्या बाधिताची स्वॅब चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. आता मात्र असे होणार नाही. पुढील आठवड्यांपासून देशातील राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचार्‍यांची ॲण्टीबॉडी चाचणी करण्यात येणार आहे. यात संबंधित बाधितामध्ये संसर्ग आहे का, संसर्गानंतर त्याच्या शरीरात ॲण्टीबॉडी विकसित झाली का, याबाबतची माहिती मिळणार आहे. पीसीआर चाचणी असे तिचे नाव असून, पूर्वीपेक्षा ती वेगळी आहे. यासाठी प्रयोगशाळेत जाण्याची आवश्यकता नसल्याचे केवळ 20 मिनिटांच्या कालावधीत निकाल हाती येणार आहेत. कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळल्यानंतर संबंधिताला आयसोलेशनमध्ये ठेवता येणे शक्य होणार असल्याचा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.