भांडेवाडी डम्पिंग यार्डला आग

    दिनांक :22-May-2020
|
-परिसरात धुराचा त्रास
नागपूर,
नागपूर शहराचा संपूर्ण कचरा सामावून घेणार्‍या भांडेवाडी डम्पिंग यार्डला (Bhandewadi dumping yard) आज सकाळी अचानक लागलेल्या आगीने (fire) काही वेळात रौद्र रुप धारण करीत संपूर्ण यार्ड आपल्या कवेत घेतले. या प्रकारामुळे परिसरातील वस्त्यांमधील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे आठ बंब प्रयत्न करीत असून रात्री उशीरापर्यंत हे काम सुरू होते.

fire to bhandewadi_1 
सकाळी दहा ते अकरा वाजता यार्डातील कचर्‍यातून धूर निघत असल्याचे ध्यानात आले. पण दोन तासात ही आग संपूर्ण यार्डात पसरली. त्यामुळे परिसरातील पवनशक्तीनगर, अब्बुमियानगर, सावननगर, साहीलनगर, अंतुजीनगर, देवीनगर, सूरजननगर, संघर्षनगर, मेहरनगरात
भागात धूर पसरला. ही बाब मनपा प्रशासनाला कळताच नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाचा एक बंब पाठविण्यात आला. परंतु आगीचे स्वरुप लक्षात घेता, दुपारी आणखी बंब घटनास्थळी दाखल झाले . या कामासाठी सिव्हिल लाईन येथील मु‘यालयातून तसेच कळमना, सक्करदरा अग्निशमन केंद्रातून प्रत्येकी दोन तर लकडगंज व सुगतनगर अग्निशमन केंद्रातून प्रत्येकी एक अग्निशमन बंब पाठविण्यात आले आणि चोहोबाजूंनी पाण्याचा मारा करण्यास प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत हे काम सुरूच होते. भांडेवाडी यार्डला आग लागण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा झाले आहेत. जवळपास दरवर्षी एकदा तरी यार्डात आग लागते आणि परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवस धुराचा त्रास तसेच दहशतीत काही दिवस काढावे लागतात.